Pune News : बापरे ! पुण्यात लोखंडी सळया घेऊन जाणारा कंटेनर पीएमपीला धडकला

एमपीसी न्युज : पुण्याच्या सहकारनगरमध्ये एक मोठा अपघात टळला. बांधकामासाठी लागणाऱ्या सळया  घेऊन जाणारा एक मोठा कंटेनर नियंत्रण सुटल्याने सरळ मागे आला आणि पीएमपीएमएलला जाऊन धडकला. पीएमपीला धडकल्याने हा कंटेनर जागेवर जाऊन थांबला. जर हा कंटेनर जागेवर थांबला नसता तर पाठीमागे जाऊन छोट्या वाहनावर आणि पादचाऱ्यांच्या अंगावरून गेला असता. त्यामुळे आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सहकार नगर परिसरातील सुयोग हॉस्पिटल समोर असणाऱ्या चढावावर लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे हा कंटेनर पाठीमागे जाऊन पीएमपी बसला धडकला. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ड्रायव्हर जखमी झाला आहे.

सुदैवाने बसमधील प्रवाशांना काहीही झाले नाही. मात्र अपघातामुळे बसमधील प्रवासी घाबरले होते. जर या कंटेनरच्या पाठीमागे पीएमपी बस नसती तर कंटेनर वेगात पाठीमागे गेला असता आणि पाठीमागे असलेल्या वाहनांना त्याने चिरडले असते. यावेळी मोठी मनुष्यहानी होऊ शकली असती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.