Pune Crime News : पुण्यात घोड्यांचा शर्यतीवर सुरू होती बेटिंग, छापा टाकून पोलिसांनी केली ही कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्याच्या हडपसर परिसरातील सय्यद नगर मध्ये घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाइन बेटिंग घेण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी यावर कारवाई करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतम अशोक बजाज (45) आणि फिरोज रशीद पठाण (32) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वानवडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अंमलदार नीलकंठ राठोड यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर परिसरातील सय्यद नगर मध्ये घोड्यांच्या शर्यतीवर काही व्यक्ती ऑनलाइन बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सय्यद नगर येथील एका घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना वरील दोन्ही आरोपी घोड्याच्या शर्यतीवर मोबाईलद्वारे ऑनलाइन सट्टा खेळत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.