Pune News : पुण्यात लहान मुलांच्या लसीची चाचणी, 920 मुलांवर चाचणी करण्यात येणार

एमपीसी न्युज :कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्याआधीच लहानगे आणि त्यांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अमेरिकन औषध कंपनी नोव्हाव्हॅक्सने तयार केलेल्या कोव्होवॅक्स लसीच्या चाचणीला पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येत आहे. 12 ते 17 आणि 2 ते 11 अशा दोन वयोगटातील प्रत्येकी 460 अशा 920 जणांवर ही चाचणी करण्यात येईल.

प्रथिन आधारित एनव्हीएक्‍स -कोव्ह 2373 ही लस अमेरिकन औषध कंपनी नोव्हाव्हॅक्‍सने विकसित केली आहे. ती भारतात कोव्होव्हॅक्‍स या नावाने उत्पादित केली जात आहे. भारतात मुलांवर चाचणी होणारी ही करोनावरील चौथी लस आहे.

कोव्होव्हॅक्‍स प्रौढ नागरिकांसाठी सप्टेंबर महिन्यात वितरित होण्याची शक्‍यता असून मुलांसाठी वर्षाच्या अखेर उपलब्ध होईल. देशाच्या औषध नियामकांनी दिलेल्या परवानगीनुसार देशातील 10 ठिकाणी या 920 जणांवर ही चाचणी घेण्यात येईल. पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम रुग्णालयाच्या वढू शाखेत ही चाचणी घेण्यात येईल.

या मुलांना 21 दिवसांनी दोन डोस देण्यात येतील त्यानंतर त्यांची वैद्यकीय देखरेख सहा महिन्यांसाठी ठेवण्यात येईल, असे सीरममधील सूत्रांनी सांगितले. या चाचणीत पहिल्या टप्प्यात 12 ते 17 वयोगटातील चाचण्या सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी घेण्यात येतील.

सीरमकडून तयार करण्यात आलेली कोव्होव्हॅक्‍स ही लस वय वर्षे 2 ते 17 या वयोगटातील मुलांसाठी आहे. त्याची प्राथमिक चाचणी जुलै महिन्यात सुरू होणार असून, त्यासाठी सीरमबरोबर या चाचणीबाबत नुकताच करार झालेला आहे.

पुढील बैठकीमध्ये चाचणी कधीपासून करायची याबाबत ठरविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शंभर ते दीडशे बालकांना ही लस देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे ही चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
– डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.