Pune : जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघात युतीला तर 7 मतदारसंघात आघाडीला मताधिक्य

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पुणे, बारामाती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी शिवसेना-भाजप उमेदवारांना 14 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 7 विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे.  

विधानसभा निवडणूक चार महिन्यावर येऊन ठेपली आहे. पुणे जिल्ह्यात चार महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेच्या सेमी फायनलमध्ये शिवसेना-भाजपने मुसंडी मारली. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी शिवसेना-भाजप उमेदवारांना 14 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 7 विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत मोदी लाट कायम राहिली तर निवडणूक न लढविलेली बरी असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे इच्छूक बोलू लागले आहेत. जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी शिवसेना-भाजप, सहयोगी मित्रपक्षाचे 17 आमदार आहेत. तर, राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचा एक असे चार आमदार आहेत.

पुण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना मताधिक्य मिळाले. तर, काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना एकाही मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैंकी तीन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी तर तीनमधून भाजपला मताधिक्य मिळाले. शिरुरमधील सहापैंकी चार मतदारसंघातून राष्ट्रवादीला तर शिवसेनेला दोन मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. मावळ लोकसभा मतदारसंघात येणा-या पुणे जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीला तीनपैकी एकाही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही.

पुणे लोकसभा मतदासंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून बापट यांना मताधिक्य

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात लढत झाली. बापट यांना 6 लाख 32 हजार 835 मते तर जोशी यांना 3 लाख 8207 मते पडली. बापट यांचा 3 लाख 24 हजार 628 मताधिक्याने विजय झाला. सहाही लोकसभा मतदारसंघातून बापट यांना मताधिक्य मिळाले. बापट यांना कोथरुडमध्ये 1 लाख 6 हजार 196 मताधिक्य मिळाले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 56 हजार 821, शिवाजीनगर 29 हजार 532, पर्वती 66 हजार 332, पुणे कॅण्टोन्मेंट 12 हजार 733 आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून 52 हजार 391चे मताधिक्य मिळाले. तर, वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांना 64 हजार 793 एवढी मते मिळाली.

बारामती लोकसभा मतदारसंघात फिफ्टी-फिफ्टी!

बारामाती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात लढत झाली. सुळे यांना 6 लाख 86 हजार 714 तर कुल यांना 5 लाख 30 हजार 904 मते पडली. सुळे या दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्या. बारामती, इंदापूर आणि भोरमधून सुळे यांना तर दौंड, पुरंदर, खडकवासला मतदारसंघातून कुल यांना मताधिक्य मिळाले. सुळे यांना बारामती विधानसभेमधून 1 लाख 27 हजार 918 चे मताधिक्य मिळाले. इंदापूरमध्ये 70 हजार 937 आणि भोर-वेल्हा-मुळशीमधून 19 हजार 504 चे मताधिक्य मिळाले. तर, भाजपच्या कांचन कुल यांना खडकवासाल्यातून 65 हजार 515 चे मताधिक्य मिळाले. दौंडमधून 7057 आणि पुरंदरमधून 15 हजार 504 चे मताधिक्य मिळाले. तर, वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांनी 44 हजार 134 मते घेतली.

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा बोलबाला!

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघ येतात. या तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य आहे. चिंचवड मतदारंसघातून बारणे यांना सर्वाधिक  96 हजार 758 मताधिक्य मिळाले आहे. तर पिंपरीतून 41 हजार 294 आणि मावळमधून 21 हजार 827 चे मताधिक्य मिळाले.

शिरुर लोकसभा मतदारसंघात अशी आहे परिस्थिती!

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना 6 लाख 35 हजार 830 मते मिळाली. तर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांना 5 लाख 77 हजार 347 मते मिळाली आहेत. डॉ. कोल्हे 8 हजार 483 मताधिक्याने विजयी झाले आहे. चार विधानसभा मतदारसंघातून डॉ. कोल्हे यांना तर आढळराव यांना दोन मतदारसंघातून आघाडी मिळाली. डॉ. कोल्हे यांना  जुन्नर विधानसभा मतदारसंघातून 41 हजार 551 मताधिक्य मिळाले. आंबेगावमधून 25 हजार 697, खेड आळंदी  7 हजार 446 आणि शिरुर विधानसभा मतदारसंघातून 26 हजार 305चे मताधिक्य मिळाले. तर, आढळराव यांना भोसरी 37 हजार 77 आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून 5 हजार 370 चे मताधिक्य मिळाले. तर, वंचित बहुजन आघाडीचे राहुल ओव्हाळ यांना तिस-या क्रमांकाची 38070 मते मिळाली.

पुणे जिल्ह्यातील हे आहेत पक्षनिहाय आमदार!

जिल्ह्यातील 14 आमदार शिवसेना-भाजपचे आहेत. त्यामध्ये भाजपचे 11 आणि शिवसेनेचे तीन आमदार आहेत. भाजपचे आमदार चिंचवड लक्ष्मण जगताप, पुणे कसबा गिरीश बापट (लोकसभेवर निवड), पुणे कॅन्टोमेंट दिलीप कांबळे, शिवाजीनगर विजय काळे, हडपसर योगेश टिळेकर, वडगावशेरी जगदिश मुळीक, खडकवासला भीमराव धोंडे, कोथरुड मेधा कुलकर्णी, पर्वती माधुरी मिसाळ, शिरुर बाबुराव पाचर्णे, मावळ बाळा भेगडे हे भाजपचे 11 आमदार आहेत. तर, भोसरीतून अपक्ष निवडून आलेले महेश लांडगे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.

शिवसेनेचे पिंपरीचे गौतम चाबुकस्वार, खेड-आळंदी सुरेश गोरे, पुरंदर विजय शिवतारे हे तीन आमदार आहेत.  जुन्नरमधून मनसेच्या चिन्हावर निवडून आलेले शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल हे महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या रासपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे अजित पवार, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे असे तीन आमदार आहेत. तर, काँग्रेसचे भोरचे संग्राम थोपटे एकमेव आमदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.