Talavade : अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुंता उलगडला; अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराने केला खून

एमपीसी न्यूज – तळवडे भागात अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा गुंता देहूरोड पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोडविला आहे. पत्नीच्या प्रियकराने हा खून केला आहे. गुन्हे शाखेने आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

बाळासाहेब भाऊसाहेब सपाटे (वय 34, रा. शिवनगरी, गणेश मंदिराशेजारी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामदास कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब आणि रामदास याची पत्नी या दोघांचे अनैतिक संबंध सुरु होते. तसेच बाळासाहेब आणि रामदास यांची ओळख होती. रामदास याला बाळासाहेब याच्यावर संशय होता. रामदास बाळासाहेब याच्या प्रेमाच्या आड येत होता. त्यामुळे बाळासाहेब याने रामदास याला रविवारी (दि. 14) दुपारी तळवडे येथील इंद्रायणी नदीच्या काठावर निर्जन स्थळी नेऊन त्याला दारू पाजली. रामदासला दारूची नशा चढताच बाळासाहेब याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

सोमवारी रामदास याचा मृतदेह आढळून आला. रामदास याच्या डाव्या हातावर रंजना असे नाव गोंदले होते. पोलिसांनी यावरून तपासाची चक्रे फिरवली. त्यावरून पोलिसांना माहिती मिळाली की, रामदास याच्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. त्यानुसार बाळासाहेब याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार भिवशेन सांडभोर, पोलीस हवालदार संतोष बर्गे, नारायण जाधव, पोलीस नाईक किशोर शेटे, किरण खेडकर, महम्मद नदाफ, राजेंद्र बारशिंगे यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.