Kamshet : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी युवक ताब्यात

एमपीसी न्यूज – कामशेत पोलिसांनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका युवकास ताब्यात घेतले. शिवाजी महाराज चौकात सापळा रचून शुक्रवारी ही कारवाई केली.

दिनेश शिंदे (वय १९ रा. गावठाण, कामशेत), असे या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावठी पिस्टल घेऊन येणार आहे. तसेच त्याने अंगात राखाडी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बी.बी. पाटील यांनी दोन पंच बोलावले व पोलीस हवालदार दरेकर, पोलीस हवालदार समीर शेख, पोलीस नाईक संतोष घोलप, पोलीस नाईक दौंडकर यांनी शिवाजी महाराज चौकात सापळा लावला.

साधारणत: साडेदहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा एक संशयित युवक पोलिसांना पायी चालताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यास घेरून त्याची झडती घेतली असता आरोपीच्या कमरेला खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्तूल व त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ३ जिवंत काडतुसे मिळून आली.

यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे पिस्टल परवान्याची मागणी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याने बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दिनेश शिंदे यास शस्त्रासह ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील पुढील तपास उपनिरीक्षक बी.बी. पाटील करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.