IPL 2021: बातमी आयपीएलची – अखेर हैदराबादचा झाला विजयी ‘सन राईज’; नऊ गडी राखून पंजाबला दाखवलं आस्मान

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – चेन्नईच्या चेपॉकवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राहुलच्या अंगलट आला आणि पंजाब फक्त नावाचेच किंग्ज आहेत, असा खेळ त्याच्यासह सर्वच तथाकथित नामांकित फलंदाजांनी केला.

अवघ्या पंधरा धावा फलकावर लागल्या असताना के एल राहुल अवघ्या चार धावा काढून भुवनेश्वरची शिकार झाला.त्यानंतर मयंक अगरवाल आणि ख्रिस गेल यांची जोडी काही तरी चमत्कार करील, अशी आशा पंजाब किंग्जला होती, पण ही आशा शेवटपर्यंत आशाच राहिली.

सर्व मोठमोठी नावं असलेले पंजाबचे कागदी सिंह मैदानावर आले आणि वापस तंबूत परतले. नवोदित शाहरुख खानने आपल्या परीने झटपट करायचा प्रयत्न केला, पण ते म्हणजे फाटक्या आभाळाला ठिगळ लावण्यासारखे होते.

हैदराबादच्या एकूण एक गोलंदाजांनी टिच्चून काटकसरीने गोलंदाजी केली आणि वीस षटकात केवळ 120 धावा करत पंजाब किंग्जचे सर्व गडी बाद झाले.

हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर अभिषेक शर्माने दोन बळी मिळवून त्याला उत्तम साथ दिली. पंजाबकडून मयंक अगरवाल व शाहरुख खानने प्रत्येकी 22 धावांचे योगदान दिले.

_MPC_DIR_MPU_II

उत्तरादाखल खेळताना हैदराबाद सनरायजर्सने धमाकेदार सुरुवात केली.आज डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हे आधीच तुटपुंजे असणारे लक्ष्य लवकरात लवकर गाठायचे या उद्देशाने तडाखेबंद फलंदाजी करत पंजाब किंग्जच्या गोलंदाजावर तुफानी हल्ला सुरू केला.

केवळ दहा षटकात 73 धावांची सलामी दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर या मोसमातला आपला पहिलाच सामना खेळणारा केन विल्यम्सनने सावध फलंदाजी करत संघाला विजय गाठून दिला.

यापूर्वी दोन वेळा उत्तम फलंदाजी करुनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या जॉनी बेअरस्टोने यावेळी मात्र आपला नावलौकिक राखताना या मोसमातले आपले पहिले अर्धशतक कडक चौकार मारत पूर्ण केले आणि अर्धशतकी खेळीनंतर विजयाची औपचारिकता धडाकेबाज रित्या पूर्ण केली.

त्याच्या याच “सामनावीर” ठरणाऱ्या धडाकेबाज खेळीने 2021 च्या 20/20 मध्ये अखेर हैदराबादचा विजयी सूर्योदय एकदाचा झाला.

पंजाब किंग्जला मात्र आपल्या खराब कामगिरीचा गंभीरपणे विचार करावा लागणार हे नक्की, नाहीतर मग ते नावापुरतेच किंग्ज राहतील, हे ही नक्की!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.