Pune News : भारतीय कला क्षेत्रात पं.बिरजू महाराज यांचे नाव अजरामर राहील – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – भारतीय कला क्षेत्रात पंडित बिरजू महाराज यांचे नाव अजरामर राहील, या शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मोहन जोशी यांनी त्यांच्या शोक संदेशात पंडित बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पंडित बिरजू महाराज आणि माझे घनिष्ठ संबंध होते. मी काँग्रेसचा शहराध्यक्ष असताना काँग्रेस भवनमध्ये बिरजू महाराजांची कथ्थक नृत्याची कार्यशाळा आयोजित केली होती. त्याप्रसंगी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी आणि आमदार रमेश बागवे यांनी त्यांचा सत्कार केला होता. पुण्यातील नृत्यप्रेमींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

पंडित बिरजू महाराज आणि नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या नृत्याचा कार्यक्रम मी काँग्रेस भवन येथे आयोजित केला होता. माझ्या आग्रहाखातर गणेश कला क्रीडा केंद्र येथे झालेल्या राजस्थान महोत्सवातही पंडित बिरजू महाराज सहभागी झाले, असेही जोशी यांनी नमूद केले आहे.

त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहातील. एका महान कलाकाराशी माझे संबंध जुळून आले, त्यांचा सहवास लाभला या आठवणी माझ्या मनात चिरंतन राहातील. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने, नृत्य कलेला जीवन वाहून घेतलेला असामान्य, थोर कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय कला क्षेत्रात पंडित बिरजू महाराज यांचे नाव अजरामर राहील, अशा भावना जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.