IND vs SA, 1st ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा उडाला धुव्वा, 31 धावांनी झाला पराभव

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)  भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोहलीने दिलेल्या तडकाफडकीच्या राजीनामा नाट्याला विसरून आज भारतीय संघाने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली नवा गडी नवे राज्यच्या धर्तीवर खेळायला सुरूवात केली खरी पण भारतीय क्रिकेटचे हे शिवधनुष्य पेलण्यात कर्णधार लोकेश राहुल किमान आजच्या पहिल्या सामन्यात तरी सपशेल अपयशी ठरला, दुसरीकडे कसोटी मालिका जिंकून आत्मविश्वास बळावलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने भारताला दणदणीत पराभूत करून एक दिवशीय मालिकेतही चांगली सुरुवात केली आहे.

पन्नासबपेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही कर्णधार बनण्याचा अनोखा पराक्रम त्याने राहुलने केला,याआधी राहुल द्रवीड ,सय्यद किरमाणी आणि या यादीत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांच्या नावासोबत आता त्याचे नाव क्रिकेट इतिहासात लिहले जाईल भारतीय संघाकडून वेंकटेश अय्यरने पदार्पण केले तर श्रेयस अय्यर,धवन,भुवनेश्वर आणि तब्बल पाच वर्षांनंतर रवी अश्विननेही पुनरागमन केले.

पार्लच्या बोलंड पार्क मैदानावर आज टेंबा  बाऊमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी पण त्यांच्या सलामी जोडीला मात्र फारसे काही करून दाखवता आले नाही. उपकर्णधार बुमराहने मलान या युवा पण आक्रमक फलंदाजांला स्वस्तात बाद केले यावेळी आफ्रिका संघाची अवस्था 1 बाद 19 अशी झाली होती,त्यानंतर आलेल्या कर्णधार बाऊमा आणि डीकॉकने 39 धावांची भागीदारी केली मात्र पुनरागमन करणाऱ्या अश्विनने डीकॉकला त्रिफळाबाद करून आपला पहिला बळी आणि आफ्रिका संघाचा दुसरा गडी बाद केला,आणि थोड्याच वेळात  वेंकटेश अय्यरने मार्करमला धावबाद करून तिसरा धक्का दिला.

यावेळी दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था तीन बाद 68 अशी केली.यावेळी भारतीय संघाला दडपण वाढवण्याची मोठी संधी होती,पण राहुलला तिचे सोने करता आले नाही, याचाच फायदा उचलत कर्णधार बाऊमा आणि वँनडेरसेन या जोडीने उचलून बघताबघता डाव सावरला.

अर्धशतकी मग शतकी भागीदारी करून झाल्यावर ही जोडी भलतीच भरात आली आणि मग त्यांनी भारतीय गोलंदाजी झोडपून काढत तब्बल 204 धावांची विक्रमी भागीदारी केली,या जोडीची ही दुसरी शतकी तर पहिलीच द्विशतकी भागीदारी ठरली,याचदरम्यान दोन्हीही फलंदाजांनी आपापले दुसरे शतकही थाटात पूर्ण केले,बाऊमाने कर्णधारपदाची जबाबदारी सार्थ पेलत आपले दुसरे एकदिवसीय शतक पूर्ण करताना 143 चेंडूत आठ चौकारासह 110 धावा केल्या,अखेर त्याची खेळी जसप्रीत बुमराहने संपवली पण तोवर त्याने संघाला फार चांगल्या आणि मजबूत  स्थितीत आणून ठेवले होते.

भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या बुमराहच्या गोलंदाजीवर कर्णधार राहुलच्या हातात झेल देऊन दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार बाद झाला,मात्र याने आफ्रिका संघाला फारसा फरक पडलाच नाही, कारण त्याचा दुसरा साथीदार वँनडेरसेन मात्र तुफानी फॉर्मात खेळत होता.त्याने केवळ 96 चेंडूत 9 चौकार आणि चार षटकार मारत नाबाद 129 धावा काढल्या,यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 296 धावा केल्या.

भारतीय संघातर्फे  बुमराहने दोन तर अश्विनने एक गडी बाद केला,बाकीचे सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले.अष्टपैलू म्हणून ओळखला जाणारा शार्दूल सर्वात महागडा ठरला,मात्र वेंकटेश अय्यरला एकही षटक का दिले गेले नाही हे कोणालाही समजले नाही.विरोधी संघाच्या आक्रमणाने कर्णधार राहुल गोंधळला असावा,पण अय्यरची गोलंदाजी यावेळी तरी दिसली नाही.

विजयासाठी 297 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरूवात राहुल आणि शिखर धवन यांनी केली,राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी तर धवनला आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखवण्याची आणि आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची दुहेरी जबाबदारी यामुळे या दोघांवर सर्वांचेच लक्ष्य लागून राहिले होते.

मात्र या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली,भागीदारी फुलतेय असे वाटत असतानाच कर्णधार राहूल वैयक्तिक 12 आणि संघाची धावसंख्या 46 असताना पहिल्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्यानंतर आला तो विराट कोहली.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत  रनमशिन वाटणारा,नित्य नवनवे विक्रम पादाक्रांत करणारा आणि रचणारा कोहली अचानक खराब फॉर्मात गेला,प्रत्येक खेळाडूला अशा स्थितीतून जावेच लागते,याला कोहली तरी कसा अपवाद ठरणार?पण त्या मुळे त्याच्या कारकिर्दीत अनेक स्थित्यंतरे घडत आहेत.

नियामक मंडळाबरोबरच मतभेद, त्यातून गेलेले टी-20चे कर्णधारपद,त्यानंतर झालेली एकदिवसीय क्रिकेट सामन्यातल्या कर्णधारपदावरूनची हकालपट्टी आणि नुकतेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर तडकाफडकी सोडलेले कसोटीचे नेतृत्व, या सर्व प्रकारच्या मानापमान नाट्यानंतर तब्बल सात वर्षानंतर केवळ खेळाडू म्हणून खेळणारा विराटकडे सर्वांचेच लक्ष्य लागून राहिले नसते तरच नवल प्रचंड दुखावलेला कोहली आता बोलावा तो फक्त त्याच्या बॅटनेच अशी इच्छा माझ्यासह अनेक क्रिकेट रसिकांची नक्कीच असणार,कारण आपण त्याच्या आक्रमतेपेक्षाही खरे दिवाने आहोत ते त्याच्या बॅटचे.

ती तळपणे त्याच्या हितापेक्षाही मोठे आहे ते भारतीय क्रिकेटसाठी. महान सचिन तेंडुलकर सोबत खेळाची सुरूवात करून त्याचा आदर्श असणाऱ्या माहीची स्थितप्रज्ञता त्याने घ्यावीच असे कोणीही म्हणणार नाही, पण  विक्रमादित्य असूनही अतिआक्रमता कधी उद्धट झाली ते कोणालाही समजलेच नाही,पण जो आदर या दोन महान खेळाडूंना मिळाला तो सच्चा क्रिकेट रसिकांनी अजूनही कोहलीला दिला नाही असे माझे स्पष्ट पण प्रांजळ मत आहे.

याबाबत मी त्याला पॉंटिंग सोबत बघतो, त्यानेही अनेक विक्रमांना पादाक्रांत केले पण  त्याच्या बद्दल अनेक खऱ्या क्रिकेट रसिकांचे मत एक उद्धट आणि उर्मट कर्णधार असेच जास्त होते,तसे तरी कोहली बाबत होवू नये,हेच मनापासून वाटते त्यामुळेच त्याची बॅट आज चालावी ही मनापासूनची इच्छा होतीच.

राहुलच्या बाद होण्यानंतर आलेल्या कोहलीने शिखर धवनच्या जोडीने डाव सावरायला सुरुवात केली,दरम्यान पुनरागमन करणाऱ्या धवनने आपल्या 34 व्या एकदिवसीय क्रिकेट मधल्या अर्धशतकाला पुर्ण करत आपले पुनरागमन धुमधडाक्यात साजरे केले.बघताबघता या जोडीने अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली,विराट संयमी तर धवन आपल्या चिरपरिचित गब्बर अंदाजात खेळत होता.

त्याने जवळपास दरचेंडूला एक धाव काढत आपली खेळी चालू ठेवली होती तर कोहली सुद्धा बऱ्यापैकी  चांगल्या सरासरीने खेळत होता,मात्र त्याने पहिल्या 30 धावात केवळ दोनच चौकार मारले होते,पण त्याने फारसा फरक पडणार नव्हता,कारण एकदा जम बसल्यावर त्याच्या बॅट मधुन मोठमोठ्या फटाक्यांची आतिषबाजी होत असतेच, म्हणूनच त्याचे टिकणे जास्त महत्वाचे होते,आणि त्याची सुरुवात बघता आज सगळेच शुभसंकेत दिसतही होतेच.मात्र या चांगल्या जमलेल्या जोडीला तोडले ते केशव महाराजने,त्याने धवनला वैयक्तिक 79  धावांवर बाद करुन ही 92 धावांची भागीदारी तोडुन भारतीय संघाला दुसरा धक्का दिला,

धवनने केवळ 84 चेंडूत 79 धावा केल्या.त्यानंतर खेळायला आला तो पंत.श्रेयस अय्यर ऎवजी त्याला बढती दिली गेली, दरम्यान  कोहलीने आपले 63 वे अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचबरोबर संघाचे दिड शतकही.कोहलीने 57 चेंडूत फक्त तीन चौकार मारत हा पल्ला गाठला.या अर्धंशतकाचा आनंद घेत असतानाच मोठा घात झाला,

आणि त्यात केवळ एकाच धावेची भर पडलेली असतानाच तो बाऊमाच्या हातात झेल देऊन शमशीच्या गोलंदाजीवर बाद झाला. या संयमी खेळीचा असा शेवट चाहत्यांना निराश करुन गेला असला तरी त्याने आज आपल्या नैसर्गिक शैलीला मुरड घालुन केलेली खेळी नक्कीच आनंददायी आणि कौतुकास्पदही आहे.त्याच्या नंतर पंत आणि श्रेयस कडून अपेक्षा होत्या,पण हे दोघेही त्यावर खरे उतरले नाहीत, ते स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र सर्वच अपेक्षा संपल्यात जमा होत्या, त्यातच नवोदित वेंकटेश अय्यर पण आला आणि गेला अन मग भारत आता हारणार याची दुःखद जाणीव  मनाला होवू लागली,

मात्र मधल्या फळीचे अपयश काही प्रमाणात का होईना तळाच्या फलंदाजांनी लढून झाकल्याने पराभवातले अंतर थोडे तरी कमी झाले.शेवटी शेवटी पराभव निश्चित झाल्यानंतर शार्दूल ठाकूरने केलेलें अर्धशतक दुःखात सुख म्हणावे तसे ठरले,त्याचबरोबर संघ पूर्ण पन्नास षटके खेळला आणि सर्व गडी बाद झाले नाहीत. अखेर दक्षिण आफ्रिका संघाने 31 धावांनी बाजी मारून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.जबरदस्त फलंदाजी करणारा वँनडरसेन सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक
अफ्रिका
चार बाद 296
बाऊमा 110 वँनदेरसेन नाबाद 129
बुमराह 48/2
भारत
8 बाद 256
धवन 79,कोहली 51,ठाकूर नाबाद 50
इंगीडी 2,शमशी 2

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.