India Corona Update : गेल्या 24 तासांत 48,648 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांच्या आत

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असतानाच दोन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 48 हजार 648 नवे रुग्ण आढळले असून. देशातील एकूण बाधितांची संख्या 80.88 लाखांवर पोहोचली आहे. असे असले तरी बरे होणा-या रुग्णांची संख्या देखील वाढली असून सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांच्या आत आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 80 लाख 88 हजार 851 एवढी झाली आहे. त्यापैकी  73 लाख 73 हजार 375 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 5 लाख 94 हजार 386 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 563 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृतांची संख्या 1 लाख 21 हजार 090 एवढी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 57 हजार 386 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्क्यांवर पोहोचलं आहे तर, कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

देशात आतापर्यंत 10 कोटी 77 लाख 28 हजार 088 नमूण्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 64 हजार 648 चाचण्या गुरुवारी (दि.28) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात (5,902), केरळ (7,020), दिल्ली (5,739), कर्नाटक (4,025) नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात भारत दुसऱ्या स्थानावर आहे मात्र, भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.