Pimpri : महापालिका पतसंस्थेच्या सभेत संचालकाचा माईक हिसकावून घेतला

सभेत आवाज दाबल्याचा पतसंस्थेचे संचालक अंबर चिंचवडे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांच्या सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलू दिले नाही. संस्थेतील अनियमिततेकडे दुर्लक्ष करुन अहवाल देणा-या संस्थेच्या नेमणुकीस विरोध दर्शविताच हातातील माईक हिसकावून घेतला. म्हणने मांडून दिले नाही. बोलताना सातत्याने अडथळा आणण्यात आला. सभेत आवाज दाबल्याचा आरोप  संचालक अंबर चिंचवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. तसेच संचालकांला शेकडो सभासदांसमोर अशी वागणूक मिळत असेल. तर सर्वसामान्य सभासदांना संस्थेकडून न्याय कसा मिळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच यापुढे हुकुमशाही आणि चुकीच्या कामांविरोधात सनदशीर मार्गाने आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांच्या सहकारी पतसंस्थेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवारी)संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली. या सभेत बोलू दिले नसल्याचा आरोप संचालक अंबर चिंचवडे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या सभेमध्ये नियमानुसार सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न व पत्राला संस्थेच्या वतीने उत्तर देणे बंधनकारक होते. तथापि, मी गेले वर्षभर विविध प्रश्न लेखी स्वरुपात संस्थेकडे पत्राद्वारे कळविले होते. त्यावर त्यांनी आजतागायत कोणतेही उत्तर दिलेले नाही. सभा सुरु असताना विषय क्रमांक आठला अंबर चिंचवडे यांनी हरकत घेतली. त्यांना उपस्थित बहुसंख्य सभासदांनी त्यांचे समर्थन केले. गेली पाच वर्ष एकच व्यक्ती वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वैधानिक लेखापरिक्षण करत आहे. संस्थेमधील असणा-या अनियमिततेकडे दुर्लक्ष करुन ते अहवाल देतात. त्याच संस्थेला सन 2019-20 साठी नेमणूक करण्यास अंबर चिंचवडे व इतर सभासदांनी हरकत घेतली असता संस्थेचे संचालक व काही सभासदांनी चिंचवडे यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. त्यांचे म्हणणे मांडण्यास विरोध केला.  काही संचालकांनी चिंचवडे यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांनी हस्तक्षेप करत अंबर चिंचवडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. संस्थेकडे गेली वर्षभर केलेला पत्रव्यवहार व त्यावर संस्थेने कोणतेही उत्तर दिले नसल्याचे चिंचवडे यांनी सांगितले. तसेच संस्थेमध्ये एका व्यक्तिची चालू असलेली हुकूमशाही याविरुद्ध माहिती दिली. संस्थेमधील अनेक कामे घटनाबाह्य व अनियमितपणे कामे चालू असल्याचे सांगितले. चिंचवडे बोलत असतानाच संस्थेच्या पदाधिका-यांनी कोणताही खुलासा न करता गोंधळ निर्माण करुन चिंचवडे यांच्या भाषणामध्ये व्यत्यय आणला, असा आरोप प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष शंकर आण्णा गावडे यांच्या नावाचा वापर करून पतसंस्थेमध्ये गेली 15 वर्षे पॅनेल निवडून आले. आण्णांच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या विचारांना यावेळी हरताळ फासण्यात आला आहे. याबाबत पुढील काळात एका व्यक्तीची चालू असलेली हुकूमशाही व अयोग्य कृती याविरुद्ध सनदशीर मार्गाने आवाज उठविणार असल्याचे अंबर चिंचवडे आणि त्यांच्या सहका-यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणाले, ”पतसंस्थेच्या सभेत कोणीही माईक हिसकावून घेतला नाही. अंबर चिंचवडे स्व:त बोलले आहेत. ते खोटे आरोप करत आहेत. त्यात कसलेही तथ्य नाही. सगळ्या संचालकांच्या मान्यतेने ठराव पास केले जात आहेत. त्यांना मान्य नसेल तर त्यांनी विरोध करावा. 14 लोकांचे संचालक मंडळ आहे. त्यातील एकाला मान्य नाही. म्हटल्यावर मनमानी कोण करतेय हे कर्मचा-यांनी ठरवावे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.