Chinchwad : दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणी अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिस-या आरोपीला अटक केल्यानंतर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चौथ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

मुकेश प्रल्हाद कांबळे (वय 19, रा. बोपोडी) असे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी देवेंद्र रामलाल बीडलानी (20, रा. आंबेडकर चौक, औंध) आणि सॅमसन सुलेमान अँमेन्ट (20, कमान फॅक्ट्री, खडकी) या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. 7 जून रोजी दुपारी सातजणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलिसांसोबत या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत आहे. पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा तळेगाव येथील त्याच्या राहत्या घरी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, गणेश सावंत, सचिन उगले, विशाल भोईर, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.