Pune News: कांदा रडवणार !  किरकोळ बाजारात एका किलो कांद्याची किंमत 80 रुपयाच्या घरात

एमपीसी न्यूज : पावसामुळे राज्यातील नवीन कांद्याचे नुकसान झाले असून, जुन्या कांद्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यातच परराज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 30 ते 65 रुपये, तर जुन्या कांद्याला 45 ते 65 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो या भावाने कांद्याची विक्री होत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज मार्केडायार्डातील कांदे व्यापाऱ्यांनी वर्तवला. 

रविवारी मार्केटयार्डमध्ये सुमारे 50 ते 60 ट्रक जुना, तर केवळ 300 गोणी नवीन कांद्याची आवक झाली.  सध्या नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे सुमारे 50 ते 60 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन कांदा चांगल्या प्रमाणात बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. पावसामुळे साठवणुकीतील जुना कांदा खराब झाल्याने त्याचा साठा कमी उपलब्ध आहे.

बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याला मागणी आहे. त्यातच कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील कांद्याचे पीक येत असते. मात्र, पावसामुळे तेथील कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. परराज्यांतून सुकलेल्या आणि वाळलेल्या कांद्याला मागणी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव तेजीत असून, पुढील काही दिवस कांद्याच्या भावात वाढ होतच राहणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.