Pune : लोकांनी जिथे टोमणे मारले त्याच पुण्यात मी विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराचा प्रमुख पाहुणा – पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७१ वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – लहानपणी माझ्यासह पाचही भावंडे पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून अनाथ अवस्थेत फिरत असताना, ‘ही धैर्यधराची मुलं’ असे टोमणे लोकांनी मारले, त्याच पुण्यात विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराचा प्रमुख पाहुणा आहे आणि माझ्यासह पाचही भावंडांना भारत सरकारने पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. कोणत्याही परिस्थितीमुळे घाबरून जाऊ नका, कष्ट करत राहा, हे लता दीदीने केलेले संस्कार आहेत, अशा भावना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१ व्या वर्धापन दिनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली. या वेळी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर, मित्सुबिशी या जपानी कंपनीचे भारतातील प्रमुख इसाहिरो निशीमाटो, जीवनसाधना गौरव पुरस्काराचे मानकरी, युवा गौरव पुरस्काराचे मानकरी तसेच, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्यही मंचावर उपस्थित होते. पं. मंगेशकर यांची मुलाखत  आनंद देशमुख यांनी घेतली.

“मला गीते नव्हे तर कविता अंतर्मुख करते, त्यामुळे मी चाली लावण्यासाठी कविता निवडतो. संत साहित्याचे तसेच आहे. त्याला चाल लावताना फारसे कष्ट पडत नाहीत, त्या शब्दांच्या मागेच सूर उभे असतात,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार, बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणाऱ्या राहिबाई पोपेरे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यशील असलेले गिरीश प्रभुणे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ. विनोद शहा या सहा जणांना “जीवनसाधना गौरव पुरस्कार”, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव, प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना “युवा गौरव पुरस्कार” पं. मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. केदार जाधव सध्या न्यूझिलंडच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या वतीने कुटुबीयांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केलेली मनोगते :

पोपटराव पवार

“पाण्यातील योगदानासाठी मला पुणे विद्यापीठाच्या वतीने मैदानावर खेळलेले क्रिकेट उपयोगी पडले. जिंकले तरी हवेत जाऊ नका आणि हरले तरी निराश होऊ नका, हे इथेच शिकलो आणि टीमवर्कचे महत्वही यातूनच समजले. आपल्याला पाणी अडवणे, पाणी जिवरणे यांच्यापलीकडे भूजलाचे योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे. ते जमले नाही तर भविष्यात देशात मोठे संकट उभे राहण्याचा धोका आहे, कारण देशातील तब्बल ३५० जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती आहे.”

राहिबाई पोपेरे

“मी कधी शाळेत गेले नाही, पण निसर्गाच्या कुशीत आणि काळ्या मातीच्या शाळेत शिकले. त्यामुळेच मला इतके पुरस्कार मिळू शकले. हा पुरस्कार माझा नाही, तर काळ्या आईचा आणि बियांचा आहे. गावागावात पैशाच्या बँका आहेत, तशा आता तालुक्यातालुक्यात, गावागावात स्थानिक बियांच्या बँका होण्याची गरज आहे. स्थानिक वाणं घराघरापर्यंत कशी पोहोचतील, यासाठी मी काम करत आहे.”

डॉ. नरेंद्र जाधव

“याच विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून माझी तीन वर्षांची कारकीर्द हा अतिशय महत्वाचा अनुभव होता. या विद्यापीठाने व पुण्यनगरीने माझे भावविश्व समृद्ध केले. मी इथे रमलो होतो, त्यामुळेच तेव्हा मी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरपदही अव्हेरले. या विद्यापीठाने मला जे दिले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

गिरीश प्रभुणे

“भटक्या समाजांचे काम करत होतो, तेव्हा लक्षात आले की त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे. मात्र, आपल्या शाळांमध्ये आणून आपण त्यांचे ज्ञान विसरायला लावत आहोत. शिवाय ही मुले बारावीपर्यंतही पोहोचत नाहीत. त्यामुळे “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” या संस्थेच्या माध्यमातून कला, कौशल्ये आणि आताचे ज्ञान देणारा अभ्यासक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. मी विद्यार्थीदशेत केलेल्या आंदोलनांमुळे या विद्यापीठाची पदवी मिळवता आली नाही. मात्र, त्याच विद्यापीठाचा हा सन्मान मिळत आहे.”

अॅड. एस. के. जैन

“संस्थाचलक आणि सेवक यांच्यात ‘मालक-सेवक’ अशा नजरेतून न पाहिल्यानेच मी शिक्षण क्षेत्रात चांगले काम करू शकलो आणि संस्थांना पुढे नेऊ शकलो. या विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कृत-प्राकत यासारख्या परंपरागत गोष्टींचे फ्यूजन आहे, त्यामुळेच हे विद्यापीठ देशात पहिल्या दहामध्ये येऊ शकले.”

डॉ. विनोद शहा

“हा पुरस्कार माझा नाही, तर जनसेवा फाउंडेशनचा आहे. वयाच्या ७३ व्या वर्षीसुद्धा मी दिवसाला १४ तास काम करतो. या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा मिळाल्याने आता दिवसाला १६ तास काम करेन.”

मुक्ता बर्वे

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, विशेषत: ललित कला केंद्रात कलाकार घडण्यासाठी पोषक वातावरण आहे. मी या विद्यापीठात भरपूर शिकले, आजसुद्धा शिकते आहे. आम्हाला दिलेल्या युवा पुरस्कारांचे वितरण हे जीवनसाधना गौरव पुरस्कारांसोबत केले ही चांगली गोष्ट आहे. कारण या मोठ्या व्यक्तिंच्या कार्याकडे पाहिले की आम्हाला आणखी किती काम करायचे आहे, याचे भान येते.”

धर्मकिर्ती सुमंत

“या विद्यापीठात असताना बाहेरही खूप शिकलो. विद्यापीठ ही समकालीन गोष्टींसाठी विरोध दर्शवण्याची एक सभ्य जागा उरली आहे, येथे मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळतेय ही आनंदाची बाब आहे.”

कुलगुरू प्रा. करमळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीचा आढाव घेतला. तसेच, सर्व पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून देऊन त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर पुरस्कार, आदर्श महाविद्यालये-संस्था हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.