IPL 2020 : दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये पंजाबने मुंबई वर केली मात 

0

एमपीसी न्यूज – रविवारी खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. मुंबई आणि पंजाब यांचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात दोन बळी घेत फक्त 5 धावा दिल्या. मुंबईला विजयासाठी सहा धावांच आव्हान मिळालं पण, अनुभवी मोहम्मद शमीने साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित राहिली. 

 

 

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईने दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये 11 धावा केल्या. पंजाबला विजयासाठी मिळालेलं 12 धावांचं आव्हान ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल यांनी जोरदार फटके मारत पार केलं. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने दुसरी सुपरओव्हर टाकली.

 

 

सुरवातीला मुंबईने मर्यादित वीस षटकात 176 धावा केल्या. 177 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण आणण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मयांक त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. यानंतर मैदानावर आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला चांगली साथ दिली. गेल राहुल चहरच्या गोलंदाजीवर 24 धावा करून माघारी परतला. लोकेश राहुल एक बाजू लावून धरत पंजाबचा डाव सावरला, राहुलने अर्धशतकही झळकावलं. जसप्रीत बुमराहने अठराव्या षटकात लोकेश राहुलला त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं. राहुलने 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 चेंडूत 77 धावा केल्या. मुंबई कडून जसप्रीत बुमराहने तीन तर, राहूल चहर ने दोन गडी बाद केले.

 

 

 

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय चुकला. रोहित, सूर्यकुमार आणि इशान किशन हे आघाडीच्या फळीतले तीन फलंदाज झटपट माघारी परतले. परंतू क्विंटन डी-कॉकने एक बाजू लावून धरत कृणाल पांड्याच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत डी-कॉकने 43 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. सतराव्या षटकांत मुंबईची अवस्था 6 बाद 119 अशी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्डने आपली जबाबदारी ओळखत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. कुल्टर-नाईलच्या मदतीने पोलार्डने मुंबईला 176 धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी 2-2 तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.