Pimpri News: दुस-या लाटेत ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींवर राहणार विशेष लक्ष

एमपीसी न्यूज – जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी कोरोना फैलावाचा वेग कमी व्हावा, या अनुषंगाने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क जास्त आहे, अशा ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची वैद्यकीय चाचणीवर अधिक भर राहणार आहे.

 

कोरोनाच्या दुस-या लाटेची भीती सतावत असली. तरी, योग्य नियोजन आणि सतर्कता बाळगल्यास कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासन तयारीला लागले असून, आरोग्य विभागाला योग्य नियोजनाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने काही व्यक्तींचा जनसंपर्क अधिक लोकांशी येतो. त्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो. हे अभ्यासातून पुढे आले आहे. दुस-या लाटेत ‘स्प्रेडर’ व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे लक्षात घेऊन सुपर स्प्रेडरचे विशेष सर्वेक्षण करून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. विविध गटांमधील व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी केली जाणार आहे. दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान 50 टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असणार आहे. महापालिकेने त्यासाठी वर्गवारीही केली आहे.

कोविड सर्वेक्षण, क्लिनिकल मॅनेजमेंट संदर्भात यापूर्वीच सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नव्याने समोर येणा-या बाबी, क्लिनिकल प्रोटोकॉलमधील बदल यासाठी कार्यक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचा-यांना पुन: प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच सोबत सर्वसामान्यांचीही जबाबदारी असून, विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने नियमित मास्कचा वापर करून इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे तसेच साबणाने नियमित हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

एकूण बाधित रुग्णांपैकी मोठ्या प्रमाणावर रुग्ण हे घरगुती विलगीकरणात आहेत. या रुग्णांचे व्यवस्थापन प्रभावीपणे होण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर पथके कार्यरत राहणार आहेत. या पथकांकडून घरगुती विलगीकरणात असलेल्यांचे मॉनिटरींग करणे अपेक्षित आहे. सध्या रुग्णसंख्या कमी असली. तरी, त्यातील प्रत्येकाचे सखोल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार निकटवासितांची प्रयोगशाळा तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालकांनी दिले आहेत.

सध्या शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत कोविड आणि नॉन कोविड रुग्णसेवेचा ताळमेल ठेवण्यासाठी रुग्णव्यवस्थेसंदर्भात काही निर्णय घेण्याचे निर्देश आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार कोविड उपचाराची जबाबदारी जिल्हा आणि शहरातील विशिष्ट रुग्णालयांवर राहणार आहे. जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये यांसारख्या रुग्णालयांमध्ये कोविड, नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून समतोल राखला जाणार आहे.

हे आहेत ‘सुपर स्प्रेडर’!
# छोटे व्यावसायिक गट – किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स

# घरगुती सेवा पुरविणारे –  दूधवाला, मोलकरणी आणि इतर नोकर, गॅस सिलिंडर वितरण करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक विषयक कामे, नळजोडणी, दुरुस्ती अशी घरगुती कामे करणा-या व्यक्ती, लॉन्ड्री, पुरोहित

# वाहतूक व्यवसायातील लोक –  मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षाचालक

# वेगवेगळी कामे करणारे मजूर – हमाली, रंगकाम, बांधकाम कामगार, पीएमपीएमएल ड्रायव्हर, कंडक्टर, सिक्युरिटी गार्ड, आवश्यक सेवेतील शासकीय – निमशासकीय कर्मचारी, पोलीस – होमगार्डस इत्यादी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.