Maval/ Shirur: दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार; गुडीपाडव्याचा मुहुर्त हुकणार 

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दोन दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 9 एप्रिल असून त्याचदिवशी अंगारकी आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांकडून अंगारकीच्या मुहुर्तावर अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. वास्तविक  गुढीपाडव्याचा दिवस उत्तम. पण त्यादिवशी (दि.6) सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याचा शुभमुहुर्त हुकला आहे.

निवडणुकीवेळी शुभमुहुर्त पाहून उमेदवारी अर्ज दाखल केले जातात. त्यासाठी ज्योतिषांकडून मुहुर्त काढून घेतले जातात. पंचांगकर्त्यांनी दिलेल्या मुहुर्तानुसार 3 ते 4 एप्रिल रोजी वर्ज्य दिवस सांगितला आहे. तर, 4 एप्रिलला दर्श अमावस्या आहे. अमावस्येला कोणतेही शुभ कार्य करु नये अशी अनेकजण परंपरा पाळतात. 5 एप्रिलला अशुभ दिवस सांगितलेला आहे. 6 एप्रिल रोजी गुडीपाडवा आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या मुहुर्ताची निवड चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी केली जाते. मात्र, याच दिवशी शासकीय सुट्टी असल्याने त्यादिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी (दि. 2 )जारी झाली आहे. कालपासून उमेदवारी अर्ज वाटप करणे आणि स्वीकरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसात  मावळ लोकसभा मतदारासंघासाठी 26 तर शिरुरसाठी 27  इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. परंतु, दोन दिवसात एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दोन्ही मतदारसंघाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 9 एप्रिल आहे. त्यादिवशी अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे त्याच दिवशी प्रमुख उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.