Pimpri : अर्धवट काम असतानाच श्रेयासाठी पुलाचे उद्घाटन, महापौरांकडूनच राजशिष्टाचाराचे उल्लंघन

विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पीसीएनटीडीएतर्फे औंध ते काळेवाडी ते साई चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट असतानाच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने परस्पर उद्घाटन केले आहे. प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी महापौर उषा ढोरे यांनी भाजप नगरसेवकांसह पुलाचे उद्घाटन केले. पालकमंत्री, विरोधी पक्षांचे गटनेते कोणालाच माहिती दिली नाही. राजशिष्टाचार न पाळता राजकीय द्वेषापोटी पालकमंत्र्यांविना पुलाचे उद्धघाटन करणे अत्यंत चुकीचे आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. प्राधिकरण प्रशासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करणार होते. परंतु, केवळ श्रेयासाठी महापौरांनी राजशिष्टाचाराचे उल्लंघन करत घाई गडबडीत पुलाचे उद्घाटन केल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत महापौर उषा ढोरे यांना पत्र दिले आहे. त्यात नाना काटे यांनी म्हटले आहे की,  प्राधिकरणाच्या  अधिका-यांशी चर्चा करुन पुलाचा उद्धघाटनाचा कार्यक्रम ठेवणे अपेक्षित होते.  राजशिष्टाचाराप्रमाणे पालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध पक्षाचे गटनेते व प्रशासन यांच्याबरोबर चर्चा करणे आवश्यक होते. परंतु, केवळ राजकीय द्वेषापोटी आपण कोणताही राजशिष्टाचार न पाळता पालिकेच्या कोणत्याही गटनेत्यांना तसेच प्राधिकरणाच्या संबंधित अधिका-यांना कल्पना न देता घाईघाईने पुलाचे उद्घाटन केले आहे.

पुलाचे काम अद्याप बाकी आहे.  राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत.  पुलावरील वायरींग उघड्यावरच आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने उद्धघाटन करुन पुल वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. यामध्ये एखादा दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण?  केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आलेला आहे. उद्घाटन भाजपच्या एखाद्या नगरसेवकाने केले असते तर तो प्रसिद्धीचा भाग म्हणून पाहिले असते. परंतु शहराच्या प्रथम नागरिकांनी कोणताही विधिनिषेध अथवा राजशिष्टाचार न पाळता राजकीय द्वेषापोटी सदर पुलाचे उद्घाटन करणे अत्यंत चुकीच आहे, असेही काटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.