Pimpri : मुख्यंमत्र्यांच्या हस्ते शनिवारी आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि हीलिंग सेन्टरच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3 नोव्हेंबर) करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. अमरसिंह निकम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर मार्गावर आशिया खंडातील एकमेव खाजगी अद्यावत आयसीयू वॉर्डसह शंभर बेडचे होमिओपॅथिचे हॉस्पिटल आणि हीलिंग सेन्टर डॉ. अमरसिंह निकम आणि सहका-यांनी उभारले आहे. त्याच्या नुतन इमारतीचे उद्‌घाटन शनिवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बिहार आणि त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील हे भूषवणार आहेत. यावेळी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, मध्यप्रदेशातील खासदार महेंद्रनाथ पांडे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड.  गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. जयेश बेल्लारे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

डॉ. अमरसिंह निकम यांनी 1995 साली पिंपरीगावात विविध आजारांवर होमिओपॅथिचे चार खाटांचे रुग्णालय सुरु केले. कोणतेही इंजेक्शन्स, सलाईन न लावता फक्त होमिओपॅथिच्या गोळ्या आणि उपचार पध्दतीने डॉ. निकम यांनी किडनीचे आजार, ह्रद्यरोग, यकृताचे आजार, मणक्यांचे आजार, कर्करोग, मधूमेह, क्षयरोग तसेच डेंगू, स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजारांचे हजारों रुग्ण बरे केले आहे. देशातील कानाकोप-यातून तसेच सौदी अरेबिया, दुबई देशातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. डॉ. अमरसिंह निकम यांना बॅंकॉक येथे इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम  झी मराठीचा द सॅम्युअल हॅनिमॅन अॅवार्ड, इंदिरा गांधी सद्‌भावना  होमिओ रत्न  अशा विविध नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अशीही माहिती उपसंचालिका डॉ. सुचित्रा निकम, डॉ. विजय निकम यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. अमरसिंग निकम यांनी होमिओपॅथिवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक डॉ. मनिष निकम यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.