Pimpri News : चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल आयुर्वेद ट्रिटमेंट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्‌घाटन   

एमपीसी न्यूज – आयुर्वेद शास्त्र हे फक्त एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर उपचार देणारे शास्त्र नसून व्यक्ती आजारी होऊ नये किंवा त्यांना अनुवंशिक रोग होऊ नये यासाठी उपचार व मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. आपल्या आहार, विहाराचे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यास सर्व व्यक्ती सुदृढ, निरोगी असे दिर्घायूष्य जगू शकतात. असे प्रतिपादन पुणे आयुष विभागाचे सहसंचालक आणि ससुन रुग्णालय आयुर्वेद विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी केले. चिंचवड येथे लोकमान्य हॉस्पिटल आयुर्वेद ट्रिटमेंट ॲण्ड रिसर्च सेंटर या अत्याधूनिक हॉस्पिटलचे उद्‌घाटन डॉ. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

चरक संहितेत वेगवेगळ्या आजारांनुसार आहार नियोजन आणि सल्ला देण्यात आला आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हाडांचे आजार, पक्षाघात या आजारावर देखील आयुर्वेदाचा उपयोग होतो. लोकमान्य हॉस्पिटल आयुर्वेद ट्रिटमेंट ॲण्ड रिसर्च सेंटर सारखे सुसज्ज हॉस्पिटल उभारणे हि काळजी गरज आहे असे डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

या उद्घाटन प्रसंगी लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. काळे, डॉ. जयकुमार ताम्हाणे, डॉ. संतोष सूर्यवंशी, निमा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुहास जाधव, डॉ. विलास जाधव, आयुर मास्टर्स व्यवस्थापक निनाद नाईक, डॉ. निलेश लोंढे, डॉ. श्यामसुंदर जगताप, डॉ. विशाल क्षिरसागर, रिसर्च विभाग प्रमुख गायत्री गणू आदी उपस्थित होते.

यावेळी आयुर्वेदाच्या मेडिकल विभाग, पंचकर्म विभाग, ओपीडी विभाग, आंतररुग्ण विभागाचेही उद्‌घाटन करण्यात आले. दरम्यान, डॉ. व्यंकट धर्माधिकारी म्हणाले की, आयुर्वेद उपचार घेणा-या रुग्णांना मेडिक्लेम मिळाला पाहिजे तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या लाटेत अनादिकालापासून अस्तित्वात असणाऱ्या आयुर्वेदाचे महत्व पुन्हा अधोरेखित आले आहे.

आयुर्वेद सर्व सामान्य जनमानसात पोहचण्यासाठी डॉक्टरांबरोबर शासनाने देखील योजना राबविणे आवश्यक आहे. लोकमान्य हे पहिले इंटिग्रेटेड आयुर्वेद आहे. येथे असलेले क्रिटिकल युनिटच्या मदतीने क्रिटिकल रुग्णावर सुद्धा उपचार करणे शक्य आहे असेही डॉ. धर्माधिकारी यावेळी म्हणाले.

प्रास्ताविक करताना डॉ. निलेश लोंढे यांनी सांगितले की, येथे सौंदर्य विभाग आणि कॉस्मेटिक (केस व त्वचेसाठी) वेगळी ओपीडी आहे. तसेच सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुसज्ज ओपीडी, पंचकर्म, आंतररुग्ण विभाग, आयुर्वेदिक मेडिकल, आयुर्वेदिक मॉल मध्ये लाकडीघाणा, तेल, तूप, मध, सैंधव, केमिकल फ्री सौन्दर्य प्रसाधने, सेंद्रिय उत्पादने उपलब्ध आहेत तसेच क्षारसूत्र, उत्तरबस्ती व इतर आयुर्वेदिक शस्त्रक्रियासाठी सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज लॅबोरेटरी, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी या सुविधा देखील आहेत.

या कार्यक्रमप्रसंगी स्वागत डॉ. निलेश लोंढे, सूत्र संचालन संजय रुईकर यांनी केले तर आभार डॉ. शामसुंदर जगताप यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.