Pune News: महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

एमपीसी न्यूज – राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.
एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे आयोजित ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचा शुभारंभ आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, घरातील महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असते. कुटुंबासाठी झिजताना तिचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सर्व महिलांची स्थिती साधारण हीच असते. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची चिंता करण्यासाठीच राज्यातील मातांसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील शेवटच्या महिलेची आरोग्य तपासणी होईपर्यंत हे अभियान सुरू राहील.
गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधेसाठी नियंत्रण कक्ष
ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाला १०४ क्रमांकावर संपर्क करताच अर्ध्या तासात आरोग्य कर्मचारी रुग्णापर्यंत पोहोचेल आणि प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नेण्यात येईल. लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याचे माहिती डॉ.सावंत यांनी दिली.
माता-भगिनींना ‘आभा’ आरोग्य ओळखपत्र देण्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्यांना टॅब देण्यात येणार आहे. महिलेच्या आरोग्याबाबत सर्व माहिती या टॅबमध्ये संकलित करण्यात येईल व त्याला पुढील टप्प्यात आरोग्य ओळखपत्राशी जोडण्यात येईल. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अधिक सुलभ होईल. सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती, नागरिकांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.व्यास म्हणाले, नवरात्रीच्या निमित्ताने १८ वर्षावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सर्वांगीण आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि आवश्यकता असल्यास उपचार अशा तीन भागात हे अभियान राबविण्यात येईल. समुपदेशनाच्या माध्यमातून भविष्यात महिलांचे आरोग्य उत्तम राखण्यात मदत होईल. आवश्यकतेनुसार महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. राज्याचे विविध आरोग्य निर्देशांक इतर राज्यांच्या तुलनेत चांगले आहे. माता मृत्यूदर अधिक कमी करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही डॉ.व्यास म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ.ओझा म्हणाल्या, मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता शालेय जीवनापासून आल्यास कुटुंबाच्या आरोग्याच्यादृष्टीने ते उपयुक्त ठरेल. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे ठरेल.
प्रास्ताविकात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे म्हणाल्या, २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या नवरात्र कालावधीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात २ लाख ४५ हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यात ९ हजार ६१७ भगिनींना मधुमेह तर १२ हजार ६७२ भगिनींना उच्च रक्तदाब आढळून आला आहे. आरोग्य तपासणीत व्याधी आढळल्यास मोफत उपचारदेखील करण्यात येणार आहे. महिलांमधील आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.
मंत्री महोदयांच्या हस्ते चष्मे आणि ‘आभा’ आरोग्य ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. आरोग्य भित्तीपत्रक आणि आरोग्यपत्रिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून नेत्रविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना चष्मे वाटप केल्याबद्दल डॉ.सावंत यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.