Pimpri : पुणे महामेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा समावेश करा; ‘दिशा’च्या बैठकीत महापौरांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोचे काम वेगात सुरु आहे. परंतु, मेट्रोला केवळ पुणे महामेट्रो असे नाव दिले आहे. शहराची स्वतंत्र ओळख असून ती पुसली जाऊ नये. त्यासाठी पुणे महामेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवारी)’दिशा’  समितीच्या बैठकीत केली. 

दक्षता व नियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज (सोमवारी)पुण्यात पार पाडली. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी बैठकीत पुणे महामेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करावा. शहराची स्वतंत्र ओळख आहे, ती पुसली जाऊ नये. त्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. पहिल्याच टप्य्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याची नागरिकांची मागणी आहे.  महामेट्रोने निगडीपर्यंत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (‘डीपीआर’)महापालिकेला सादर केला आहे. त्याचे सादरीकरण झाल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.

त्याचबरोबर नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महामेट्रोने तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी महापौर जाधव यांनी बैठकीत केली. त्यावर जावडेकर म्हणाले, ‘पुणे महामेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवडचा उल्लेख करण्याबाबत विचार केला जाईल. त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.