Mumbai News : आयकर विभागाकडून छापेमारी सुरूच! दिवसभरात ‘या’ महत्त्वाच्या तीन व्यक्तींच्या घरी आयकर विभागाचे छापे

एमपीसी न्यूज – एकीकडे राज्यभर महिला दिन उत्साहात साजरा होत असताना मुंबई – पुणे शहरात आयकर विभागाने केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने सकाळीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल आणि मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच, मंत्री परब यांच्या सीएच्या कार्यालयावर सुद्धा आयकर विभागाने छापे टाकले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

केंद्रीय यंत्रणांचे राज्यात विविध ठिकाणी छापेमारीचे सत्र सुरू आहे, नवाब मलिकांच्या अटकेनंतर या यंत्रणांच्या रडारवर आणखी कोण अशी उलटसूलट चर्चा होत असताना आज आयकर विभागाने राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या सीएच्या कार्यालयावर छापे टाकले. याआधीच सकाळी अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम आणि शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. दरम्यान, मुंबई वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही छापेमारी सुरु आहे, अशी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी आयकर विभागाची टीमसोबत सीआयएसएफचे जवानसुद्धा तैनात आहेत. एमआयजी क्लबच्या येथे अनिल परब यांच्या सीएचे निवासस्थान असून परब सुद्धा शेजारीच राहतात, त्यामुळे अनिल परब यांच्या कार्यालयावर सुद्धा छापे पडणार का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.

कोण आहेत संजय कदम?

शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संजय मानाजी कदम हे संघटक असून राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेतील महत्त्वाची व्यक्ती असणारी संजय कदम यांच्या घरी आज सकाळीच आयकर विभागाने छापा टाकला.

कोण आहेत राहुल कनाल?

राहुल कनाल शिर्डी संस्थानाचे विश्वस्त असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. आयकर विभागाने कनल यांना सुद्धा रडारवर घेत आज सकाळीच मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी धडकले. वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आयकर विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी छापेमारी सुरू केली आहे.

दरम्यान, शिवसेनेतील महत्त्वाच्या फळीतील माणसांना केंद्रीय यंत्रणांनी लक्ष केल्याने शिवसेनाला हा धक्का मानला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.