Panvel news: ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, मनुष्यबळ वाढवा; गर्दीच्या ठिकाणावर नियंत्रण ठेवा : श्रीरंग बारणे

पनवेल शहरातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज  – पनवेल विधानसभा क्षेत्र सर्वात मोठे असून दाट लोकवस्ती आहे. मुंबई लगत हा परिसर येत असल्याने लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे येथे  कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण देखील जास्त आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी. गर्दीच्या ठिकाणावर नियंत्रण ठेवावे.

होम आयसोलेशेनमध्ये असलेल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून कोणी घराबाहेर पडणार नाहीत. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. रुग्णवाढ विचारात घेऊन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, मनुष्यबळ वाढवावे. त्यासाठी सिडकोची मदत घ्यावी, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा खासदार बारणे यांनी आढावा घेतला. कोरोनाची रुग्णसंख्या, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना याची सविस्तर माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडून घेतली. रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.  उपायुक्त  संजय शिंदे, प्रांतधिकारी दत्तात्रय नवले, पोलीस उपायुक्त  शिवराज पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ सल्लागार बबनदादा पाटील बैठकीला उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 46 हजार 545 रुग्ण आत्तापर्यंत आहेत. गेल्या  21 तारखेपासून जवळपास 14 हजार नवीन रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळले आहेत. त्यामध्ये खारघर, कामोठे, नवीन पनवेल, कळंबोली याठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. उपजिल्हा रुग्णालय, पनवेल, एमजीएम हॉस्पिटल, कामोठे, डीसीएच कळंबोली,इंडिया बुल्स या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण असून रुग्णांवर उपचार चालू आहेत.

सद्यस्थितीत ऑक्सिजन, बेड यांची उपलब्धता आहे. परंतु भविष्याचा विचार करून एमजीएम हॉस्पिटल येथील 200 बेड महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आहे.  शासनाच्या मदतीने कळंबोली येथे जंबो कोविड सेंटर चालू करण्यात येणार आहे. यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. पनवेल विधानसभा क्षेत्र सर्वात मोठे आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मुंबई लगत हा परिसर येत असल्याने लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे येथे रुग्णांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे उपाययोजनामध्ये वाढ करावी.

जास्त गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणावे. 85 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही  याची काळजी घ्यावी. भविष्यातील रुग्ण वाढ लक्षात घेता ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढवावेत.  मनुष्यबळ वाढविण्याबाबत महापालिकेच्या वतीने काळजी घेण्यात यावी. त्यामध्ये सिडकोची मदत घ्यावी. सिडकोच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर साठी मदत घ्यावी अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.