Pune News : पुणे-लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या वाढवल्या

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 12 ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक सुरू करण्यात आली होती. चार फेऱ्यांची वाढ केल्यामुळे आता दोन्ही बाजूने आठ फेऱ्या होणार आहेत.

पहिल्या टप्प्यामध्ये 12 ऑक्टोबरपासून चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत असलेल्या या सेवा अपुऱ्या पडत असल्याने 26 ऑक्टोबरपासून पुणे आणि लोणावळ्यातून प्रत्येकी दोन अशा चार नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानुसार आता पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 6.28 आणि 8.05 वाजता, तर संध्याकाळी 4.15 आणि 6.02 वाजता लोणावळ्यासाठी लोकल सोडण्यात येणार आहे. लोणावळ्यातून सकाळी 9.55 व संध्याकाळी 5.30, 5.50 आणि 7.35 वाजता पुण्यासाठी लोकल सोडण्यात येत आहे. या सर्व गाडय़ा विशेष लोकल या श्रेणीतील असल्याचे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलसाठी विशेष ओळखपत्राची आवश्यकता आहे. पोलीस आयुक्तांकडून हे ओळखपत्र मिळवता येणार आहे. ‘क्यू आर कोड’सह असलेल्या या ओळखपत्राशिवाय स्थानकात प्रवेश दिला जाणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.