Pimpri News : बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर नियोजितरित्या वसलेले आणि विस्तारलेले शहर आहे. भलेमोठे रस्ते, उड्डाणपूल यामुळे शहराच्या सुंदरतेत भरच पडली. पण कालांतराने बेशिस्त वाहन चालक, रस्त्यांवरील अतिक्रमणे, वाहनांची वाढती संख्या आणि अपू-या पार्किंगच्या सुविधा यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल विद्रुपीकरणाकडे चालली आहे.

भल्यामोठ्या रस्त्यांच्या बाजूने नियोजित फूटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र शहरातील पथारी, हातगाडीवाले यांनी फूटपाथवर कब्जा केल्याने नागरिकांना चालण्यासाठी फूटपाथच राहिले नाहीत. त्यात त्यावरच वाहने पार्क केल्याने आणखीनच कोंडी झाली. दुकानदार आणि वाहनधारकांनी फूटपाथवर अतिक्रमण केले. या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीला वाव मिळाला आहे.

दिसेल त्या ठिकाणी अस्ताव्यस्त वाहने पार्क केल्याने रस्त्यावर जागा अरुंद राहतात. परिणामी नागरिकही रस्त्यावर येतात आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अनेक वेळेला वाहन चालक आणि पादचारी नागरिक यांच्यामध्ये वादही होतात. यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होते.

_MPC_DIR_MPU_II

हिंजवडी येथे मागील काही दिवसांपूर्वी एक वृद्ध नागरिक रस्त्याने पायी चालत जात होते. फूटपाथवरील अतिक्रमणामुळे ते रस्त्यावरून चालू लागले. तर रस्त्यावरही अनेक वाहने पार्क केली होती. त्यातूनही रस्ता शोधत जात असताना एका वाहन चालकाने त्यांना धक्का दिला आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. ‘पायी चालण्यासाठी फूटपाथ आहेत. रस्त्याने चालू नका वैगेरे बराच गोंधळ झाला. हा वाद हिंजवडी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी वाहन चालकाच्या विरोधात कारवाई केली.

चिखली येथे काही गॅरेज दुकानदार त्यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेली वाहने थेट बीआरटी मार्गात पार्क करतात. संबंधित मार्गावर बीआरटी बस सुरु नसल्याचे कारण सांगून संपूर्ण रस्ता वाहने पार्क करून झाकला जातो. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अशा वाहनांमुळे मोठी गोची होते. हे चित्र चिंचवड स्टेशनकडून कुदळवाडीकडे जाणा-या मार्गावर टाटा मोटर्स कंपनीजवळ पाहायला मिळते. काळेवाडी येथे बीआरटी मार्गावर बस, ट्रक, टेम्पो, रिक्षा अशी वाहने सर्रास पाहायला मिळतात. असे अनेक प्रसंग सांगता येतील.

रस्त्यावर होणारे पार्किंग यामुळे पादचारी, अन्य वाहन चालकांना जाण्या-येण्यासाठी नाहक त्रास होतो. संपूर्ण शहरात या बेशिस्तीचे दर्शन मिळते. भोसरी येथे उड्डाणपुलाखाली तर अनधिकृत पार्किंगमधून रस्ता जातो की काय, असं म्हणायची वेळ येते. पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, हिंजवडी, वाकड या भागातही तीच परिस्थिती आहे. या बेशिस्तीला वेळीच चाप लावला तर ठीक नाहीतर विद्रुप शहरात सर्वांचंच स्वागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.