Chinchwad News : कोरोनाचा वाढता प्रसार; अंगारकी चतुर्थीला मोरया गोसावी मंदिर बंद राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंगारकी चतुर्थीनिमित्त संभाव्य गर्दी टाळण्यासाठी  श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा उद्या (मंगळवारी) दिवसभर बंद राहणार आहे. याबाबतची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी  दिली.

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त चिंचवडगावातील  महासाधू मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच दर्शनानंतर अंगारकीनिमित्त्त भरणार्‍या बाजारात देखील खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होवू लागली आहे.

दिवसाला साडेतीनशे ते चारशेच्या पटीत रुग्ण आढळत आहेत. उद्या (मंगळवारी) अंगारकी चतुर्थी आहे. चतुर्थीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होवू शकते. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंगारकी चतुर्थीनिमित्त संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा उद्या (मंगळवारी) दिवसभर बंद राहणार आहे.

”शहरात कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांच्या आदेशानुसार संभाव्य गर्दी टाळण्यासाठी उद्या अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे”, मंदार महाराज देव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.