IND VS AUS : ऑस्ट्रेलियन संघाची शानदार सुरुवात

एमपीसी न्यूज : बलाढ्य भारतीय फलंदाजीचा खात्मा करत (IND VS AUS) या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदाच जोरदार सुरुवात केली. पहिले दोन कसोटी सामने पराभूत झाल्याने मालिका भारतीय संघाकडे पुन्हा एकदा राहणार हे निश्चित झाल्यानंतर निराश न होता ऑस्ट्रेलियन संघाने इंदूर येथील होळकर मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नव्याने सुरुवात करत या मालिकेत पहिल्यांदाच जोरदार कामगिरी करत जगज्जेता संघाचा पूर्ण अविर्भाव दाखवून भारतीय संघाला प्रथम केवळ 109 या अतिशय किरकोळ धावसंख्येत गुंडाळून अर्धी मोहीम फत्ते केली.

नंतर आपल्या पहिल्या डावाची सुरुवात करताना आजच्या दिवसाच्या पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला, तेव्हा चार गडी गमावून केलेल्या 156 धावांमुळे पहिल्याच दिवशी 47 धावांची मोठी आणि महत्वपूर्ण आघाडीही घेत भारतीय संघाला चांगलेच खिंडीत पकडले आहे.

अजूनही पाहुण्या संघाचे सहा गडी शाबूत असून त्यांचा प्रयत्नही आघाडी जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न असेल आणि तसे झालेच तर भारतीय संघ या कसोटीत आणखीनच अडचणीत येईल. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आजच्या तिसऱ्या कसोटीत दोन्हीही संघाने आपल्या संघात प्रत्येकी दोन बदल केले. भारतीय संघाने खराब फॉर्मात असलेल्या के एल राहुल ऐवजी युवा शुभमन गील, तर मोहम्मद शमी ऐवजी उमेश (IND VS AUS) यादवला संघात स्थान दिले, तर ऑस्ट्रेलियन संघाने कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणासाठी मायदेशी परतल्यानंतर त्याच्या जागी मिशेल स्टार्कला तर ब्लाँडेल ऐवजी कॅमरोन ग्रीनला संघात स्थान दिले, तर स्टिव्ह स्मिथकडे बंदीचा काळ संपल्यानंतर पुन्हा नेतृत्व करण्याची संधी आली.

भारतीय संघासाठी अतिशय खराब अशी सुरुवात झाली. पहिल्याच षटकात दोन वेळा नशिबाने वाचलेल्या रोहीत शर्माला बाद होण्यासाठी नक्की कशाची घाई झाली होती? हे कोणालाही समजले नाही. अतिशय खराब फटका मारुन तो वैयक्तिक 12 धावा करुन तंबूत परतला. त्याला कुनेमननी यष्टीच्या मागे अलेक्स कॅरीच्या हातून झेलबाद करुन भारतीय संघाला पहिला मोठा धक्का दिला.

यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 27 होती, यात केवळ 7 धावांची भर पडलेली असतानाच फॉर्मात असलेला गील आज तरी शुभ म्हणावी अशी खेळी करु शकला नाही, अर्थात त्याला पडलेला चेंडू नक्कीच चांगला होता. त्यालाही कुनेमननेच बाद केले.

यानंतर तर भारतीय संघाच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. भरवशाचा पूजारा, युवा प्रतिभावंत श्रेयस, जडेजा, कोहली, भरत अशी एकापेक्षा एक मोठी नाव असलेले महारथी छोट्या खेळया करुन (काही तर काहीही न करताच) तंबूत परतले आणि मायदेशी वाघ असलेली भारतीय मजबूत फलंदाजी कांगारू गोलंदाजासमोर भिगी बिल्ली भासू लागली.

टॉड मर्फीने या मालिकेत सलग तिसऱ्यादा कोहलीला बाद करुन त्याच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.या खराब आणि आत्मघातकी फलंदाजीमूळे भारतीय संघ उपहाराला खेळ थांबला तेंव्हा 7 बाद 84 अशा बिकट परिस्थितीत दिसत होता.या कठीण परिस्थितीत उपहारानंतरही काहीच बदल झाला नाही आणि उपहारानंतर अगदी काहीच वेळात या धावसंख्येत केवळ 25 धावांची भर घालून भारतीय संघ 109 धावातच सर्वबाद झाला.ही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची 2008 नंतरची दुसरी नीचांकी धावसंख्या आहे.

युवा गोलंदाज कुनेमनने सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्यांदाच आपल्या कारकिर्दीत एका डावात 5 गडी बाद करण्याची मोठी कामगिरी केली आहे. पहिल्या दोन कसोटीत दणदणीत मार खाल्ल्यानंतर आणि कसोटी मालिका भारतीय संघाकडे सलग चौथ्यांदा राहणार हे निश्चित झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघाने या कसोटीत मात्र आधीचे सर्व काही मागे टाकत या कसोटीला नव्याने सुरुवात करून या मालिकेत पहिल्यांदाच आपल्या झुंजार वृत्तीचे प्रदर्शन करत शानदार खेळ करत यजमान भारतीय संघाला जोरदार टक्कर दाखवली आहे.

खेळपट्टी खराब होती का? भिंगरी सारखी गरगरत होती का? तर या प्रश्नांची उत्तरे नाहीच असे वाटावे असा खेळ ऑस्ट्रेलियन संघाने करत सणसणीत उत्तर देत आपल्या पहिल्या डावाची शानदार सुरुवात करत भारतीय संघाला या मालिकेत पहिल्यांदाच दडपणाखाली ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात झाल्या झाल्या जडेजाने प्रथम हेडला अगदी स्वस्तात बाद करुन भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले अन त्यानंतर थोड्याच वेळात लांबूशेनला त्रिफळाबाद करुन सनसनाटी निर्माण करुन दिली. भारतीय संघ या विकेटचा आनंद साजरा करत असतानाच नोबॉलचा बजर वाजला आणि लांबूशेनसहित संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने सुटकेचा निश्वास टाकला.

या अपवादानंतर मग मात्र ख्वाजा आणि लांबूशेन जोडीने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत भारतीय संघाला लवकर यश मिळू दिले नाही. दोन्हीही फलंदाज भारतीय फिरकीला आत्मविश्वासाने तोंड देत होते. ख्वाजाने या मालिकेतले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करत भारतीय गोलंदाजी बोथट ठरवली.या जोडीची 96 धावांची मोठी भागीदारी झाल्यानंतर अखेर जडेजानेच पुन्हा एकदा लाबूशेनला त्रिफळाबाद करत आपली मोठी चूक भरून काढली आणि भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले.

तो बाद झाल्यानंतर आलेल्या आणि कमिन्सच्या मायदेशी परतल्यामुळे आलेल्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार्या स्टिव्ह स्मिथला आज आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी होती.त्याच दृष्टीने त्याने खेळायला सुरुवातही केली होती, पण दुसऱ्या बाजूने उत्तम खेळणाऱ्या ख्वाजाचा संयम जडेजाने संपवून त्याची 60 धावांची खेळी खल्लास करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले आणि या धक्क्यातून सावरण्याआधीच कर्णधार स्मिथलाही वैयक्तिक 26 धावांवर यष्टीमागे झेलबाद करवून आजच्या दिवसातला चौथा गडीही बाद करत संघाला बऱ्यापैकी आश्वस्तही केले.

यावेळी पाहुण्या संघाची धावसंख्या चार बाद 146 अशी झाली होती, पण नंतर उरलेल्या खेळात पीटर हॅन्डसकॉम्ब आणि ग्रीनने आपापल्या विकेट्स शाबूत ठेवून संघाला 156 धावावर नेवून ठेवले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलियन संघाकडे 47 धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे आणि त्यांचे अजूनही सहा गडी बाकी असल्याने त्यांच्यासंघात नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उद्याच्या पहिल्या सत्रात पाहुण्या संघा ला लवकरात लवकर गुंडाळून दुसऱ्या डावात चांगले खेळण्याचा भारतीय संघाचा प्रयास राहील,अन्यथा ही कसोटी भारतीय संघाच्या आवाक्याबाहेर जाण्याचा धोका अटळ आहे.

संक्षिप्त धावफलक
भारत
पहिला डाव सर्वबाद 109
कोहली 22,गील 21,रोहीत 12 ,भरत 17,उमेश 17,अक्षर नाबाद 12
कुनेमन 16/5,लायन 34/3
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव 4 बाद 156
लाबूशेन 31,हेड 9 ख्वाजा 60,स्मिथ 26
हँडस्कोंब नाबाद 7,ग्रीन नाबाद 6
जडेजा 63/4

Pune : गड-दुर्गांचे संवर्धन करत अतिक्रमणे रोखावी; महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीची मागणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.