IND VS AUS : भारताचा मानहानीकारक पराभव

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात (IND VS AUS) मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आज विशाखापट्टनम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा मानहानीकारक पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी करत पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड करत उट्टे काढले आहे. दहा गडी आणि 39 षटके राखून ऑस्ट्रेलियन संघाने भारताला दणदणीत मात दिली आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मजबूत वाटत असलेल्या यजमान संघाची आज नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्टार्क आणि कंपनीने पुरती वाट लावली.अतिशय आग ओकणारी गोलंदाजी करणाऱ्या स्टार्कने एकाही भारतीय तथाकथित महान फलंदाजांना स्थिरावूच दिले नाही.
शुभमन गील जणू पहिल्या सामन्यातल्या बाद झालेल्या प्रकारचीच पुनरावृत्ती करत आजही बाद झाला.सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर तो पहिल्या सामन्यातल्या प्रमाणेच लाबूशेनच्या हातात झेल देवून भोपळा न फोडताच बाद झाला.या धक्क्यातून सावरत कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा डावाला गती देत आहेत असे वाटत असतानाच रोहित शर्मा, स्मिथच्या अफलातून झेलामुळे तंबूत परतला, अर्थात रोहितने फटकाही खराबच मारला होता, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर 20/20 मधला मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा पण कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात अजूनही आपले स्थान पक्के न करू शकलेला सूर्यकुमार यादवही स्टार्कच्याच गोलंदाजीवर बाद झाला आणि मैदानावर उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांचा आवाज एकदमच बंद झाला.
सूर्यकुमार सलग दुसऱ्या सामन्यातही पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे,ही त्याच्यासाठी एक धोक्याची (IND VS AUS) घंटाच आहे.यावेळी भारतीय संघाची धावसंख्या तीन बाद 32 अशी बिकट झाली होती, यानंतर पहिल्या सामन्यात एक अविस्मरणीय खेळी करणारा के एल राहुल आला त्याने कोहलीला साथ द्यायला सुरुवात केली, पण हाय रे दैवा,केवळ 9 धावांवर असतानाच तोही स्टार्कचीच आणखी एक शिकार झाला आणि भारतीय संघ पुरता अडचणीत आला.
यानंतर तीनच चेंडूच्या अंतरावर उपकर्णधार पांड्याही खराब फटका मारून एबोटच्या गोलंदाजीवर स्मिथच्या आणखी एका अप्रतिम झेलामुळे बाद झाला,आणि भारतीय संघ नामुष्कीजनक धावसंख्या करतोय की अशी धास्ती मनाला वाटू लागली जी दुर्दैवाने खोटी ठरलीच नाही.
भारतीय संघ मायदेशातल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्वांत कमी धावसंख्येतच गारद झाला, खरे तर एक वेळ अशी होती की भारतीय संघ 100 धावा तरी करेल का नाही असे वाटत होते, पण कोहली आणि अक्षरच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाने कशीबशी 100 री पार केली.
कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलने नाबाद 29 धावा केल्याने भारतीय संघाच्या 117 तरी धावा झाल्या. ऑस्ट्रेलियन संघाकडून मिशेल स्टार्कने जबरदस्त गोलंदाजी करत पाच गडी बाद करून भारतीय फलंदाजीची जणू कत्तलच केली तर त्याला आपल्या भारतातल्या पहिल्याच सामन्यात खेळणाऱ्या सीयन एबोटने तीन गडी बाद करत उत्तम साथ दिली,तर एलिसनेही दोन गडी बाद करत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
विजयासाठी 300 चेंडूत फक्त 118 धावांची आवश्यकता असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या षटकापासूनच जोरदार (IND VS AUS) फलंदाजी करताना हे आधीच माफक वाटणारे आव्हान अधिकच किरकोळ करून टाकले.मार्श आणि हेड यांनी केवळ 11 च षटकात हे लक्ष्य गाठताना जबरदस्त फलंदाजी केली.
भारताला भारतात दोन वेळा दहा गडी राखून पराभूत करणारा एकमेव विदेशी संघ ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ही ऐतिहासिक कामगिरी करून देण्यात या जोडीचा फार मोठा वाटा आहे. मार्शने पहिल्या सामन्यातल्या फलंदाजीप्रमाणे याही सामन्यात घणाघाती फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात दुसरे अर्धशतक ठोकून भारतीय गोलंदाजीचे वाभाडे काढले,त्याने फक्त 36 चेंडूत चौकार आणि तितकेच चौकार मारत नाबाद 66 धावा केल्या तर त्याला हेडनेही तितकीच उत्तम साथ देताना केवळ 30 चेंडूत 10 चौकार मारत नाबाद 51 धावा केल्या.
या तुफानी फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने 39 षटके आणि दहा गडी राखून भारतीय संघाला दणदणीत पराभूत करुन तीन सामन्याच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी करुन मालिका जिवंत ठेवली आहे,आता मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना येत्या 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे, त्यातला विजेता मालिकेचा विजयी होईल. आपल्या कारकीर्दतल्या 9 व्या पाच विकेट्स हॉल मिळवणारा (IND VS AUS) आणि आज भारतीय फलंदाजीचा कर्दनकाळ ठरलेल्या स्टार्कला सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
Pune : महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलमध्ये योग कार्यशाळा संपन्न