Ind Vs Aus T20 Series : पहिल्या T-20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. 162 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकात 150 धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या T-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन लवकर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराटही फारशी चमक दाखवू शकला नाही. तो अवघ्या 9 धावा काढून माघारी परतला.

एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता. परंतू, दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज आपली विकेट फेकत होते. संजू सॅमसन, मनिष पांडेही फारकाळ तग धरु शकले नाहीत. लोकेश राहुल 40 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 51 धावा करून बाद झाला.

यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतू, हार्दिक हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला 161 धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने 3 तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

भारताने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली.

कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी अर्धशतकी भागीदारी केली. चहलने कर्णधार फिंचला (35) माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला, त्यानंतर चहलने स्टिव्ह स्मिथला देखील स्वस्तात माघारी धाडलं.

टी. नटराजनने ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडलं. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टलाही नटराजनने माघारी धाडलं, त्याने 34 धावा केल्या. लगेचत चहलने मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवत कांगारुंना पाचवा धक्का दिला.

यानंतर भारतील गोलंदाजानी सामन्यावर वर्चेस्व गाजवत पहिला विजय नोंदवला. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी 3-3 तर दीपक चहरने 1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.