Ind Vs Aus Test Series : माफीनामा ! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली भारतीय संघाची माफी

एमपीसी न्यूज – भारत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतर चौथ्या दिवशीही काही चाहत्यांनी हाच प्रकार केला.

चौथ्या दिवशीही सिराजला सीमारेषेवर वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. सिराजने ही बाब कर्णधार अजिंक्य रहाणे व पंच यांच्या कानावर घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता. भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं.

या सर्व प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागितली आहे. तसेच, गैरवर्तन करणाऱ्या चाहत्यांची गय केली जाणार नसल्याचं पत्रात म्हटले आहे.

काय म्हटलंय अधिकृत पत्रात ?
‘भारतीय खेळाडूंबद्दल चाहत्यांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.