Ind Vs Aus Test Series : भारताचा दारुण पराभव, 8 गडी राखून ऑस्ट्रेलिया विजयी

एमपीसी न्यूज – भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली.

भारताकडून विजयासाठी मिळालेल्या 90 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद 51 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या डावांत भारतीय संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं.

यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन यासारखे फलंदाज माघारी परतत राहिले. त्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली.

हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीला फलंदाजी करत असताना दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करु शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचं सोपं आव्हान मिळालं.

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत चांगले फटके खेळले. पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाल्यानंतर मॅथ्यू वेड धावबाद झाला आणि भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर मार्नस लाबुशेनही आश्विनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना बाद झाला.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत पहिला कसोटी सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.