Ind Vs Eng ODI : पुण्यात होणारे भारत – इंग्लंड एकदिवसीय सामने विनाप्रेक्षक

एमपीसी न्यूज – पुण्यातील गहुंजे मैदानावर 23,25 आणि 28 मार्च रोजी भारत – इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. हे सर्व सामने दिवस-रात्र खेवळवण्यात येणार आहेत. पुण्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने हे तिन्ही सामने विना प्रेक्षक खेळवले जाणार आहेत.

पुण्यात होणाऱ्या सामन्यांसाठी शनिवारी (दि. 27) महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर व मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. कोरोनाविषयक नियमांचं पालन करून व प्रेक्षकांविना सामन्यांचं आयोजन करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत घेतला.

पुण्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मालिकेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असून, आता आवश्यक त्या अन्य परवानग्या घेता येतील. राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले, असे काकतकर यांनी सांगितले.

दरम्यान, भारत – इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. गुरूवारपासून (दि.4) या मालिकेतील चौथा व अंतिम कसोटी सामना सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.