IND Vs Eng Test Series : भारतीय फिरकीपुढे इंग्लंड फेल, विजयासाठी केवळ 49 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज – भारतीय फिरकी गोलंदाजी पुढे इंग्लंडचे खेळाडू सपशेल फेल ठरले. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाची दुसरी इनिंग अवघ्या 81 धावांत संपुष्टात आली. इंग्लंडला नाममात्र 48 धावांची आघाडी मिळाली असून, भारतीय संघासमोर विजयासाठी 49 धावांचे आव्हान आहे. भारताकडून अक्षर पटेलने पाच तर अश्विननं चार बळी घेतले.

इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत आटोपला होता. त्यानंतर लीच-रुट जोडीने 9 गडी बाद करत भारतीय संघाला 145 धावांत गुंडाळलं. रोहित शर्माची 66 धावांची खेळी वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ 33 धावांची आघाडी मिळाली होती. दमदार गोलंदाजीच्या जीवावर इंग्लंडने सामन्यात वापसी केली होती. पण, दुसऱ्या डावात इंग्लंड संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने 19 तर बेन स्टोक्स याने सर्वाधिक 25 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांत आटोपला आणि नाममात्र 48 धावांची आघाडी मिळाली.

भारताला विजयासाठी केवळ 49 धावांची गरज आहे. भारताकडून सर्वाधिक पाच बळी अक्षर पटेलने घेतले. पिंक बॉल कसोटी सामन्यात एका सामन्यात अकरा बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. अश्विननं चार बळी घेत चारशे धावांचा टप्पा पार केला. वॉशिंग्टन सुंदरने अखेरचा एक बळी घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.