Ind Vs Eng Test Series : पंतची शतकी खेळी, दुसऱ्या दिवसाअखेर भारत 7 बाद 294

एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंड दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने केलेल्या 101 धावांच्या जीवावर भारतने सात गड्यांच्या बदल्यात 294 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताला 89 धावांची आघाडी मिळाली आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी बाद 24 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पुजारा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात केली. पण, पुजारा 17 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. अजिंक्य रहाणेला साथीला घेऊन रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 27 धावांवर अजिंक्य रहाणे देखील अँडरसनची शिकार ठरला.

दुसऱ्या सत्राच्या खेळात रिषभ पंतला साथीला घेऊन एक बाजू लावून धरणाऱ्या रोहित शर्माने डावाला आकार दिला. ही जोडी स्थिरावत असल्याचं वाटत असतानाच रोहित शर्मा 49 धावसंख्येवर पायचीत झाला. रिषभ पंतने 117 चेंडूंत 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकत भारताच्या डावाला आकार दिला. वॉशिंग्टन सुंदरनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारतानं 7 बाद 294 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताकडे 89 धावांची आघाडी आली आहे. वॉशिंग्टन सुंदर नाबाद 60 तर अक्षर पटेल नाबाद 11 धावांवर खेळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.