Ind Vs Eng Test : इंग्लंड समोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज – चौथ्या दिवशी शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंड विरुद्ध 367 धावांची आघाडी घेतली. इंग्लंड समोर विजयासाठी आता 368 धावांचे मोठे आव्हान आहे. आज उरलेल्या दिवसाच्या खेळात आणि कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड हे आव्हान पार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल.

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी तिसऱ्या दिवशी भारतासाठी अर्धशतकी सलामी दिली आहे. भारताच्या 83 धावा झाल्या असताना जेम्स अँडरसनने राहुलला यष्टीपाठी झेलबाद केले. राहुलने 6 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. रोहितची साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात आला. लंचनंतर रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या पुजारासोबत शतकी भागीदारीही रचली. 64 व्या षटकात रोहितने वैयक्तिक 94 धावांवर असताना षटकार ठोकत शतक साजरे केले. त्याचे हे भारताबाहेर कसोटीतील पहिलेच शतक ठरले.

 

चहापानानंतर पुजाराने आपले 31वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडने 81व्या षटकात रोहित आणि पुजाराला माघारी धाडले. रॉबिन्सनने या दोघांना झेलबाद केले. रोहितने 14 चौकार आणि एका षटकारासह 127 तर पुजाराने 9 चौकारांसह 61 धावा केल्या. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (17) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. चांगल्या फॉर्मात दिसत असलेल्या विराटला वैयक्तिक 44 धावांवर मोईन अलीने बाद केले. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ओव्हर्टनने विराटचा झेल घेतला. विराटने 7 चौकार लगावले.

लंचनंतर शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत यांनी दमदार भागीदारी करत इंग्लंडला थकवले. शार्दुलने अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. जो रूटने शार्दुलला बाद केले. शार्दुलने 7 चौकार आणि एका षटकारासह 60 धावा केल्या. शार्दुलनंतर ऋषभ पंतही अर्धशतक करून बाद झाला. पंतने 50 धावांच्या खेळीत 4 चौकार ठोकले.

दरम्यान, भारत इंग्लंड कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.