IND Vs NS 1st Test : दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंड संघाची मजबूत छाप

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – कसोटी क्रिकेट आजही इतके लोकप्रिय आणि अनिश्चित का आहे याची पावलोपावली प्रचिती देत आजच्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस जेव्हा संपला तेव्हा त्या दिवसाचा एकमेव मानकरी हा पाहुणा न्यूझीलंड संघच होता याबद्दल कोणाच्याही मनात कसलेही दुमत उरले नसेल. भारतात 345 धावात गुंडाळून दिवसअखेर नाबाद 129 धावा करून न्यूझीलंडने चोख प्रत्युत्तर दिले.

कालच्या 4 बाद 258 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना जडेजा आणि अय्यर या जोडीला आज पहिल्या काही मिनिटातच नजर लागली आणि आपल्या कालच्या वैयक्तिक 50 या धावसंख्येत काहीही भर न घालता जडेजा टीम साऊदीच्या एका अप्रतिम इनस्विंगवर त्रिफळा बाद झाला, अन भारतीय प्रेक्षकांच्या आशेला पहिला सुरुंग लागला.

त्याच्या जागी आलेल्या रिद्धीमान सहाने सर्वात जास्त वयाचा यष्टीरक्षक म्हणून खेळण्याचा फारूक इंजिनिअर यांचा कित्येक वर्षांपासून अबाधित असलेल्या या अनोख्या विक्रमाला आपल्या नावे केले, मात्र त्याने फारसे काही योगदानही दिले नाही. त्याने श्रेयसला साथ मात्र दिली. जडेजाच्या बाद होण्याने श्रेयस अय्यरच्या एकाग्रतेवर कसलाही परीणाम झाला नाही आणि त्याने केवळ चौकाराची भाषा करताना जेमिसन या कालच्या सर्वात यशस्वी पाहुण्या गोलंदाजावर चांगलाच हल्ला करत आपली रननीती सिद्ध केली.

बघताबघता त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात विक्रमाला गवसणी घालत आपले शतकही पूर्ण केले, अशी कामगिरी करणारा तो जगातला 112 वा तर 16 वा भारतीय फलंदाज ठरल. ज्या यादीत लाला अमरनाथ, मोहम्मद अझरूद्दीन,सौरभ गांगुली, रोहित शर्मा अशी मोठमोठी नावे आहेत, त्यांच्या जोडीने आता 16 वे नाव म्हणून श्रेयस अय्यरचा उल्लेख असेल.

गंमत म्हणजे दुसऱ्या कसोटीत जेंव्हा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करेल तेव्हा कदाचित त्याला जागा श्रेयसलाच रिकामी करून घ्यावी लागेल. आता असेच होईल की नाही ही बाब चर्चेचा मुद्दा होईल पण आजतरी त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचे खरोखरच सोने केले आहे, यात काही शंकाच नाही. त्याला कसोटी पदार्पण करताना मिळणारी मानाची कॅप साक्षात विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्याकडून मिळालेली होती.

त्याला सार्थ न्याय देत श्रेयसने एक खणखणीत शतक करून आपल्याला मिळालेली संधी ही योगायोग नसून यावर आपला हक्क आहे हे सिद्ध करतांना संघ व्यवस्थापनाच्या पुढे कोणाला अंतीम 11 मध्ये खेळवावे हे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दुर्दैवाने शतक झाल्यानंतर काही वेळातच तो 106 धावांवर बाद झाला आणि उरलेल्या फलंदाजीला न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज टीम साउदीने सहज गुंडाळून मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला केवळ 345 धावांवर संपुष्टात आणले.

आपल्या कसोटी कारकिर्दीत 13 वा आणि भारताच्या विरुद्धच्या तिसऱ्या वेळेला एका डावात पाच विकट्स मिळवण्याचा विक्रम करुन भारतीय डावाला एका मजबूत स्थितीत असताना आणि या कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड बसलीय असे वाटत असतानाच जबरदस्त मुसंडी मारत आपल्या संघाला या कसोटीवर पकड आज तरी मिळवून दिली आहे असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही.

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मैदानावर टिकू शकला नाही की किवी आक्रमणासोबत दोन हात ही करू शकला नाही. अपवाद आश्विनच्या बहुमूल्य 38 धावांचा त्यामुळेच धावफलकावर 345 या सन्मानजनक धावा दिसत होत्या. भारतीय गोलंदाजासाठी भारतात या धावा खूप आहेत असे वाटणे स्वाभाविकही होते.

मात्र, न्यूझीलंड सलामी जोडी टॉम लथम आणि विल यंग यांनी जबरदस्त खेळताना आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न जाऊ देता नाबाद 129 धावा करून भारताला चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन्हीही फलंदाज आपापल्या अर्धशतक पूर्ण करून तंबूत नाबाद परतले आहेत, त्यामुळे भारताचे 345 लक्ष्य एकदमच छोटे वाटायला लागले आहे. यंग 75 वर तर लाथम 50 धावांवर नाबाद आहेत.

पाहुणा संघ अजूनही 218 धावांनी पिछाडीवर असल्याने भारतीय संघासाठी या सामन्यात परतण्याची संधी अजूनही जीवंत आहेच. आज सकाळच्या सत्रात जशी भारतीय डावाची पडझड झाली तशीच उद्या किवी संघाचीही व्हावी अशी अपेक्षा भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेला असेल तर दोन्ही सलामीवीरांनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा योग्य तो फायदा उठवून उद्या मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य केन विल्लीमसनचे असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.