Ind vs NZ test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची दमदार सुरुवात

एमपीसी न्यूज: (विवेक कुलकर्णी) मालिकेतल्या निर्णायक कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली, मात्र नाबाद 80 वरून एकदम तीन बाद 80 अशी बिकट अवस्था झाल्यानंतर आजचा शतकवीर मयंकने आधी श्रेयस अय्यर सोबत तर नंतर वृद्धीमान साहासोबत नाबाद अर्धशतकी भागीदारी नोंदवतांना संघाचा डाव सावरताना आपल्या वैयक्तिक चौथ्या शतकाला गवसणी घातली.अंधुक प्रकाशामुळे आज खेळ थांबवला गेला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या चार बाद 221 अशी मजबूत दिसत होती.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावर तब्बल पाच वर्षांनंतर आज कसोटी सामना तोही प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु झाला,तेंव्हा बहुतांश स्टॅण्ड प्रेक्षकांनी भरलेले दिसले.

दुखापतीमुळे पहिल्या कसोटीबाहेर असणारा विराट कोहली आज संघात परत आला,तो पहिल्या कसोटीत नेतृत्व करून सामना अनिर्णित ठेवणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या जागेवर. रहाणेला नक्की काय दुखापत झाली हे तो,कोहली आणि संघ व्यवस्थापनच जानो,पण त्यामुळे विराट कोणाच्या जागेवर खेळणार या सकाळपर्यंत वाटणाऱ्या यक्षप्रश्नाला सहज उत्तर मिळाले, त्याबरोबरच इशांत शर्मा आणि भारतीय संघातला आजच्या घडीचा सर्वात तंदुरुस्त आणि चपळ खेळाडु असणारा जडेजाही नादुरुस्त आहेत असे जाहीर झाले.

अंतीम क्षणापर्यंत ज्याच्या डोक्यावर टांगती तलवार लटकत होती, त्या मयंक आगरवालचा अंतिम 11 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि दैवाने खुश होवून दिलेल्या या संधीचे शब्दशः त्याने सोने करत आजच्या दिवसावर आपली छाप सोडून सर्व टीकाकारांनी केलेल्या टीकेला आपल्या बॅटने उत्तर दिले.आता हा योगायोग आहे की तिथंल्या मातीचा गुणधर्म हे तुम्हीच ठरवा,पण मयंक सुद्धा तिथूनच येतोय ज्या राज्यातून भारताचा खराखुरा क्रिकेटचा राजदूत म्हणून जगभर मान मिळवणारा कोच राहुल द्रविड सुद्धा. म्हणूनच टिकेने व्यथित न होता आपल्या उत्तम खेळाने त्याने उत्तर दिले असावे.तरीही शतक पूर्ण झाल्यावर त्याने केलेला जल्लोष बरेच काही सांगून गेला.

विराट कोहलीने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना,जयंत यादव,मोहम्मद सिराज यांच्यासह संघांची धुरा सांभाळली.
आज शुभमन गील आणि मयंक आगरवाल या नवोदित जोडीने भारतीय संघाला अतिशय चांगली आणि आश्वासक सुरुवात करून दिली,दोघेही आक्रमक आणि एकेरी दुहेरी धावां घेतानाच खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेत खेळत होते,बघताबघता या दोघांनी आपली पहिली अर्धशतकी सलामी भागीदारीही नोंदवून कोहलीच्या निर्णयाला सार्थ ही ठरवले.शुभमन गील मयंकच्या तुलनेत अधिक सुंदर खेळत होता.

मात्र नेहमीप्रमाणे चांगल्या सुरुवातीनंतर तिचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्याला आजही अपयश आले,आणि एजाज पटेलच्या गोलंदाजीवर तो 71 चेंडूत 44 धावा काढून झेलबाद झाला,त्याने या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला,यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 1 बाद 80 होती, अन इथूनच घसरगुंडी नाट्य सुरू झाले.गीलच्या जागी आलेल्या आणि आपल्या खराब फॉर्ममुळे दडपणाखाली असणारा चेतेश्वर पुजारा एकदम खराब फटका मारून बाद झाला.

तर पाठोपाठ आलेल्या कर्णधार कोहलीला पंचाच्या एका खराब निर्णयामुळे शून्यावरच तंबूत परतावे लागले,रिप्लेमध्ये हा चेंडू त्याच्या पायाला लागण्याआधी बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसत होते, आतापर्यंत या मालिकेत पंचगिरी आंतरराष्ट्रीय दर्जाची मुळीच झालेली नाही या आरोपाला पुष्टी देणारा हा चुकीचा निर्णय त्यावर शिक्कामोर्तब करुन गेला असे वाटावे असा तो निर्णय नक्कीच होता. मात्र यामुळे भारतीय संघाची अवस्था नाबाद 80 वरुन तीन बाद 80 अशी कठीण झाली होती.

योगायोग म्हणजे या तिन्हीही विकट्स एजाज पटेलने घेतल्या होत्या, हा तोच आहे,ज्याने पहिल्या कसोटीत शेवटच्या दिवशी श्रेष्ठ भारतीय गोलंदाजीला नामोहरम केले होते,तर आज याने प्रथितयश भारतीय फलंदाजीला खिंडार पाडत कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ या म्हणीची आठवण करून दिली.
मात्र त्यानंतर पहिल्या कसोटीचा मानकरी श्रेयस अय्यरने जम बसलेल्या मयंकला सुयोग्य साथ देताना डावाला सावरले.

त्याने जम बसलेल्या मयंकला केवळ साथ देण्याचे महत्वपूर्ण काम करताना 80 धावांची भागीदारी चौथ्या गड्यासाठी करून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले.मात्र तो सुद्धा वैयक्तिक 18 धावा करून एजाजचीच चौथी शिकार ठरला. यावेळेस धावफलक चार बाद 160 अशी कठीण परिस्थिती दर्शवत होता,मात्र त्याच्या जागी आलेल्या वृद्धीमान साहाने चांगली फलंदाजी करत आजचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाचे अधिक नुकसानही होवू दिले नाहीच,सोबत भारतीय संघाला दोनशेच्या पुढे सुद्धा आणून ठेवले.

याचदरम्यान मयंकने आपल्याला चांगल्या सुरुवातीला शतकी खेळीत रूपांतरीत करून आक्रमक शैलीत आपले चौथे कसोटी शतक पूर्ण केले.त्याने संयम आणि आक्रमकता याचा सुरेख संगम साधत केवळ 246 चेंडुत नाबाद 120 धावा करताना चार उत्तुंग षटकार आणि तब्बल 14 चौकार मारून आपल्या खेळीला सजवले. त्याचे शतक ही भारतीय संघासाठी सुद्धा खूप मोठी आणि आश्वासक बाब आहे,कारण शतक केल्यावर तो त्याचे मोठया शतकात रूपांतर करतो असा इतिहास आहे.दुसऱ्या बाजूने साहाने सुद्धा आपल्या नाबाद 25 धावांमध्ये तीन चौकार आणि एक षटकार मारून आपल्या कानपूर कसोटीतल्या दुसऱ्या डावातल्या फॉर्मला इथे सुध्दा चालूच ठेवून संघाला चांगलाच दिलासा दिला आहे.

आज सकाळचा तब्बल दोन तासाचा खेळ मैदान ओले असल्याने वाया गेला होता,तो काही अंशी दिवसाच्या शेवटी भरून काढण्यात आला,आजही केवळ 70 षटकांचा खेळ झाला,त्यात भारताने चार गडी गमावून 221 धावा केल्या आहेत.आता उद्या सकाळच्या सत्रात आजच्या नाबाद जोडीने आणखी काही धावा जमवल्या तर भारतीय संघाला या कसोटीवर नक्कीच पकड मिळवता येईल तर दुसरीकडे पाहुण्या संघाला सुद्धा लवकरच विकेट्स मिळवून भारतीय संघाला गुंडाळण्याची संधी आहे,यात यशस्वी कोण होणार हे उद्या कळेलच, पण आजच्या दिवसाचा मानकरी मात्र नक्कीच शतकवीर मयंक आहे ,याबद्दल कोणाच्याही मनात कसलीही शंका नसेल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.