Ind vs Nz: पाहुण्या न्यूझीलंडला अवघ्या 62 धावांत गुंडाळून भारतीय संघाची मजबूत पकड

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – विश्वविक्रमाला पादाक्रांत करणाऱ्या इजाज पटेलच्या कामगिरीवर अतिशय खराब फलंदाजी करून हाराकरी करत न्यूझीलंड फलंदाजांनी विरजण पाडले, आणि नीचांकी 62 धावांत सर्व गडी बाद झाल्याने आलेली फॉलोऑनची नाचक्की भारतीय कर्णधार कोहलीच्या विराट धोरणाने वाचली असली तरी पाहुण्या किवी संघापुढे या सामन्यात पराभावाचे गडद सावट आलेले आहे.

दुसऱ्या डावात भारतीय सलामी जोडीने जोरदार खेळ केल्याने भारतीय संघाची आघाडी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी 332 झाली असून अद्याप एकही फलंदाज बाद झालेला नाही.

त्याआधी कालच्या चार बाद 221 वरुन आज सकाळी मयंक आणि वृद्धीमान साहाने पुढे सुरुवात केली असता अगदी काहीच क्षणात एजाज पटेलने साहा आणि अश्विनला लागोपाठच्या चेंडूवर बाद करून आपल्या संघाला चांगलीच सुरुवात करून दिली आणि आपल्या छोट्याशा कारकिर्दीतला पहिला पाच बळीचा टप्पाही गाठला.

एका बाजूने जेमिसन, साऊदी, असे मोठमोठे गोलंदाज अपयशी ठरत असताना एकटा एजाज भारतीय फलंदाजीला खिंडीत पकडत होता, 6 बाद 227 अशी धावसंख्या झाल्यावर न्यूझीलंड संघाला उरलेल्या चार गड्याला बाद करून सामन्यात परत येण्याची सुवर्णसंधीही त्याने मिळवून दिली होती, पण मयंक आगरवालने अक्षर पटेलला सोबत घेवून आपली खेळी चालूच ठेवली, अपेक्षेप्रमाणे त्याने शतकी खेळीचे  दीडशतकी खेळीत रूपांतरही केले, मात्र बरोबर 150 धावांवर तो एजाजची सातवी विकेट ठरला, तेव्हा भारतात भारतीय संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा एजाज पहिलाच किवी गोलंदाज ठरला.

याआधी अशी कामगिरी सर ग्रेट रिचर्ड हॅडलीने यांनी 6 बळी घेत आपल्या नावावर करून ठेवलेला विक्रम मंदगती डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करू पाहणाऱ्या एजाजने त्या 45 वर्षाहून अधिक काळ अबाधित असलेल्या विक्रमाला मोडीत काढले.

दुसऱ्या बाजूने अक्षर पटेलने आपल्या पहिल्या कसोटी अर्धशतकाला पूर्ण केले, पण त्यानंतर अगदी काहीच क्षणात आज जणू मिडास स्पर्श लाभलेल्या एजाजने त्याच्यासह सिराज आणि उमेशला बाद करून कसोटीच्या एका डावात सर्वच्या सर्व बळी मिळवण्याच्या विक्रमाला गाठून आपले नाव क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षराने कोरले, याआधी फक्त दोनच गोलंदाज ही ऐतिहासिक कामगिरी करू शकले आहेत, ते म्हणजे इंग्लंडचे जिम लेकर आणि आपला अनिल कुंबळे.

आज ही कामगिरी इजाजने करून भारतीय संघाला एकहाती गारद करण्याची महान कामगिरी केली.त्याने 47 षटकात 119 धावा देत ही महान कामगिरी केली.

भारतीय संघाकडून मयंक आगरवालने सर्वाधिक  150 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 52 धावा केल्या. यामुळेच 3 बाद 80 ते सर्व बाद 325 अशी सन्मानजनक धावसंख्या भारतीय संघाला उभारता आली.

उत्तरादाखल खेळताना पाहुण्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. आपल्या या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात खेळताना मोहम्मद सिराजने अतिशय घातक गोलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला सावरूच दिले नाही.

त्याने प्रथम यंगला कोहलीच्या अप्रतिम झेलामुळे बाद केले, तर रॉस टेलरला एका अप्रतिम स्विंग वर त्रिफळाचित केले तर हंगामी कर्णधार लाथमला श्रेयस अय्यरच्या हातून झेलबाद करुन त्यांची अवस्था तीन बाद 17 अशी केली. या पडझडीने किवी संघ सावरला नाही तो नाहीच, त्यात आज केन विल्यम्सनही नव्हता.

रॉस टेलरचे अपयश आजही चालूच राहिले, त्यामुळे किवी संघ दडपणाखाली पुरता बावरला आणि उरलेले काम रवीचंद्रन अश्विनच्या जादुई फिरकीने तमाम केले. त्याने केवळ 8  धावा देत चार बळी बाद केले. या दोघांना अक्षर पटेलने दोन तर जयंत यादवने एक बळी घेत उत्तम साथ दिली.

भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे विश्वविजेता किवी संघ केवळ 62 धावाच करू शकला. ज्या त्यांच्या आजतागायतच्या सर्वात कमी धावा आहेत. पाहुण्या संघाकडून कर्णधार लाथम 10 तर जेमिसन 17 हे दोघेच दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

खरेतर भारतीय संघ यावेळी किवी संघाला फॉलोऑन देऊ शकत होता, पण कोहलीने तसे न करता आपल्या फलंदाजाना पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची संधी देणे पसंत केले. आज सामन्याचा केवळ दुसराच दिवस असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस खेळून काढला तरी फारसा फरक पडणार नाही. भारतीय संघाच्या विजयाला,त्यामुळे या निर्णयाला फारसे कोणी गैर ठरवणार नाही.

दुसऱ्या डावात शुभमन गील ऐवजी पुजारा सलामीला आला, क्षेत्ररक्षण करताना गीलच्या पाठीला चेंडू लागल्याने तो त्यावर उपचार घेत होता, एरवी अतिशय संथ खेळणारा पुजारा आज मात्र आक्रमक दिसला, त्याने पहिल्या दोन चेंडूवर दोन खणखणीत चौकार मारत आश्वासक सुरुवात केली.

पहिल्या डावात दीडशतकी खेळी करून आपला आत्मविश्वास बुलंद करणारा मयंक आजही दुसऱ्या डावात त्याच लयीत खेळला‌. त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ दुसऱ्या डावात बिनबाद 69 अशा मजबूत स्थितीत आलेला आहे. मयंक नाबाद  38 तर पुजारा 29 धावा काढून नाबाद आहे, या मुळे आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 332 धावांची मोठी आघाडी आली आहे, उद्या यात जास्तीत जास्त भर घालून डाव घोषित होवू शकतो.

पाहुण्या संघाला मात्र आपल्या फलंदाजीतली हाराकरी भोवणार, ही शक्यता आज तरी दिसत आहे. क्रिकेटमध्ये कधीही भाकित करू नये, असे म्हणतात, पण या सामन्यात मला तरी भारतीय संघाचा सामना आणि मालिका विजय स्पष्ट दिसत आहे.

हे चित्र बदललेच तर त्यासाठी फार मोठा चमत्कार व्हायला हवा. तो झाला तर एक अतिशय चांगला सामना पाहण्याचा योग सर्वांना येईल, पण माझ्या दृष्टीने तर भारतीय संघ आज खूप खूप पुढे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.