Ind vs NZ : भारत विजयापासून केवळ पाच पाऊले दूर; 540 धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 5 बाद 140!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – मालिका आणि सामना जिंकण्याची भारतीय संघासाठी आता केवळ औपचारिकताच उरली असून उद्या ती कधी पूर्ण होणार इतकीच उत्सुकता आता बाकी आहे. 540 या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची अवस्था 5 गडी बाद140 अशी झाली असून अद्याप त्यांना चमत्कार करायचा असेल तर काही तरी अविश्वसनिय कामगिरी करावी लागेल,कारण त्यांना उरलेल्या दोन दिवसात 400 धावा कराव्या लागतील ज्या अजिबातही सोप्या आणि होतील असे वाटत नाही.

कालच्या बिनबाद 69 वरुन आजचा खेळ सुरू झाल्यावर पुजारा आणि मयंकने शतकी भागीदारी नोंदवून किवी गोलंदाजांचा अंत पाहिला. पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणाऱ्या मयंकने दुसऱ्या डावातही जबरदस्त फलंदाजी केली, जरीही तो पूर्णपणे फीट नव्हता, मात्र संघहीत डोळ्यासमोर ठेवून त्याने खेळाला प्राधान्य दिले. आणि आपले पाचवे कसोटी अर्धशतकही त्याने पूर्ण केले.

त्याचा धडाका आणि आक्रमकता पाहता तो आपल्या दुसऱ्या शतकालाही लवकरच गाठेल असे वाटत असताना एजाजला उंचावरून मारण्याची घाई त्याला नडली आणि तो 62 धावा काढुन यंगच्या हातात झेल देऊन बाद झाला.त्याने 108 चेंडूत 62 धावा काढताना 9 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्याचा जोडीदार पुजारा आज बऱ्याच दिवसांनी बहरात आला आहे असे वाटत होते, मात्र तोही 47 धावा काढून एजाजचाच दुसरा बळी ठरला. त्याला अर्धशतकी खेळी करण्यासाठी केवळ तीन धावा कमी पडल्या.

यानंतर शुभमन गील आणि कर्णधार कोहलीने डाव घोषित न करता पुढे खेळ चालू ठेवणे पसंत केले. एक प्रकारे त्याने न्यूझीलंड संघासोबत माईंडगेम खेळायचे ठरवले असावे, असे वाटत होते.

युवा शुभमन गीलला मात्र या संधीचा फायदा उठवता आला नाही ,कसलेही दडपण नसतानाही तो आपला जम बसल्यावर सुद्धा मोठी खेळी आजही करू शकला नाही आणि 47 धावा करून रचीन रवींद्रनची पहिली कसोटी विकेट ठरला.

दुसऱ्या बाजूने कर्णधार कोहलीसाठी सुद्धा एक चांगली संधी होती. आपला हरवलेला फॉर्म परत मिळवायची, मात्र 86 चेंडू खेळल्यावर सुद्धा त्याला केवळ आणि केवळ 34 धावाच जोडता आल्या.

क्रिकेट हा खेळ कसा बेरहम आहे बघा, साधारण 2019 पर्यंत विराटची एकदिवशीय आणि कसोटी सामने मिळून तब्बल 71 शतके पूर्ण झाली होती, तो एकदिवसीय सामन्यात तरी सचीनच्या विक्रमाला सहज पादाक्रांत करेल असे वाटत होते.

मात्र मागील तीन वर्षांत त्याला एकही शतक मारता आले नाही, या दडपणाखाली त्याचा खेळ फुलेंना हे आज डोळ्याला जाणवतही होते, आता हे दुष्टचक्र लवकरच संपावे इतकीच अपेक्षा आपण रसिक म्हणून करू शकतो, नाही?

आजही तो 34 धावा करून रचीनच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्याच्या काही चेंडू आधीच श्रेयस अय्यर ही एकदिवसीय वा 20/20 क्रिकेटच्या थाटात खेळत होता, पण तो ही एका संशयास्पद निर्णयामुळे बाद झाला. पाच गडी बाद होऊनही, 500 च्या आसपासची आघाडी असूनही विराटने डाव घोषित केला नाही, मग याचा खराखुरा फायदा उठवला तो अक्षर पटेलने!

त्याने डाव घोषित करण्याआधी केवळ 26 चेंडूत 4 षटकार आणि तीन चौकारासह नाबाद 41 धावा करताना किवी गोलंदाजीवर तुफानी हल्ला केला. त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 9 धावा हव्या असतानाच विराटने डाव घोषित केला, तेंव्हा सर्वानाच नवल वाटले. अर्थात वैयक्तिक विक्रमापेक्षा संघहित महत्वाचे असते हे जरी मान्य केले तरी अक्षरचा आजचा धडाका बघता त्याने जास्तीत जास्त तीन चार चेंडूत या 9 धावा केल्या असत्या, पण विराट की माया विराटही जाने, असे म्हणतात ते खोटे नाही.

त्याने आपला दुसरा डाव 276 धावांवर घोषित करून न्यूझीलंड संघापुढे 540 धावांचे विशाल आणि जवळपास अशक्यप्राय असेच लक्ष्य ठेवले आहे. या कसोटीतला एक मोठा योगायोग म्हणजे भारताच्या दोन्ही डावांत मिळून पडलेल्या 17 च्या 17 विकेट्स या केवळ फिरकी आणि भारतीय वंशाच्या गोलंदाजांनी घेतल्या आहेत.

एजाजने दुसऱ्या डावातही सर्वाधिक चार बळी घेत आपली सर्वोत्तम गोलंदाजीचे पृथक्करण नोंदवले आहे तर रचीन रवींद्रनने तीन बळी घेतले. भारताकडून दुसऱ्या डावातही मयंकनेच सर्वाधिक धावा केल्या.

आजच्या उरलेल्या खेळाला सुरुवात केल्यानंतर न्यूझीलंड संघाची सुरुवात खराबच झाली, कर्णधार टॉम लाथम केवळ सहा धावा करून अश्विनच्या चेंडूवर पायचीत झाला तेव्हा पाहुण्या संघाच्या केवळ 15 धावाच झाल्या होत्या.

त्यानंतर विल यंग आणि मिशेलने लढा चालू ठेवताना आणखी 32 धावा जोडल्या असतानाच अश्विनने आणखी एक धक्का देत यंगला सूर्यकुमारच्या हातून झेलबाद करून तंबूत परत पाठवले. हा धक्का कमी होता की काय म्हणून पाहुण्या संघाच्या सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक अत्यंत खराब फटका मारून आपली विकेट शब्दशः फेकली, तो सुध्दा अश्विनचाच तिसरा बळी ठरला.यावेळी न्यूझीलंड संघाची धावसंख्या तीन बाद 55 अशी कठीण झाली होती.

त्यामुळे सामना आजच संपेल की काय असे वाटत असतानाच मिशेलने आक्रमक धोरण दाखवले. आक्रमकता आणि बचाव याचा चांगला संगम दाखवताना त्याने निकोलस सोबत 73 धावांची चांगली भागीदारीही केली. यांच्या भागीदारीकडे बघता हे दोघेच आजचा दिवस खेळून काढतील, असे वाटत असताना अक्षर पटेलने ही जोडी तोडली. मिशेलने 2 षटकार आणि 9 चौकार मारताना 60 बहुमूल्य धावा केल्या.

पण त्याच्या बाद होण्याने भारतीय संघासाठी विजयाची संधी आजच पुन्हा एकदा निर्माण झाली, यावर त्यांच्या विकेटकीपर प्लंदलच्या हाराकरीने झाले. एक होत नसलेली चोरटी धाव घेण्याची घाई त्याला संकटात घेवून गेली आणि श्रीकर भरत या दुसऱ्या राखीव खेळाडूच्या चपळ थ्रोने त्याला भोपळा न फोडताच तंबूत परतावे लागले. त्यानंतर उरलेल्या आजच्या षटकात किवी फलंदाजांनी अधिक नुकसान होऊ दिले नाही, ज्यामुळे त्यांचा आजचा पराभव उद्यावर ढकलला गेला इतकेच.

आजचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड संघाच्या दुसऱ्या डावात पाच बाद 140 धावा झाल्या आहेत. हेन्री निकोलस 38 तर रवींद्रन दोन धावावर नाबाद आहेत. भारताकडून दुसऱ्या डावात रवी अश्विनने केवळ 17 धावा देत तीन गडी बाद केले आहेत तर अक्षरने एक गडी बाद केला आहे.

उद्या सामन्याचा चौथा दिवस असल्याने पाहुणा संघ आणखी किती वेळ तग धरेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.