IND VS PAK : भारतीय संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आशिया कप 2023 स्पर्धेतल्या लीग फेरीत (IND VS PAK) पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर सुपर फोरच्या सामन्यामधे सुद्धा पावसाने रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला खरा,पण जिद्दी भारतीय संघाच्या मनोनिग्रहापुढे हे असामानी संकटही थमले. त्यांनंतर संपूर्ण खेळावर आपला जबरदस्त पगडा ठेवत भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 228 धावांनी मोठा पराभव करत आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली आहे.

आधी फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीला भारतीय गोलंदाजांनीही दिलेल्या तितक्याच जोरदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानावर असलेल्या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा मोठा पराभव करत मागील काही वर्षांपासून त्यांच्यावर असलेल्या आपल्या वरचष्म्याला कायम ठेवले.

त्याआधी आज सकाळी भारतीय संघात ने कालच्या 24.1 (IND VS PAK) षटकातल्या दोन बाद 146 वरुन आज पुन्हा डाव पुढे सुरू केला आणि राहुल ,कोहली जोडीने पहिल्या काही षटकातच जोरदार आणि आत्मविश्वासपुर्ण खेळ सुरू केला.

सहा महिन्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या राहुलने आपले 13वे अर्धशतक 60 चेंडूंत पूर्ण केले ज्यात 5 चौकार आणि 1 षटकार सामील होता.

या दोघांनी बघताबघता भारतीय संघाच्या डावाला चांगलाच आकार दिला. कोहली राहूल जोडीने शतकी भागीदारी नोंदवून मोठ्या धावसंख्येची आशा दाखवली.

त्यानंतर थोड्याच वेळात कोहलीने आपले 66 वे एकदिवशीय अर्धशतक पूर्ण केले. 2017साली बरमिंगम येथे भारतीय संघाच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतक नोंदवले होते, आज जवळपास सहा वर्षांनंतर पाकिस्तान विरुद्ध कोलंबो येथे तशीच कामगिरी केली.

आपला जम बसल्यानंतर या दोघांनीही अप्रतिम फलंदाजी करत मोठे खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने कसे करतात याचे सुंदर प्रात्यक्षिक दाखवले.

के एल राहुलवर मागील काही वर्षांत अनेकदा टीका झाली, त्यातच त्याच्या कामगिरीतही सातत्य नव्हते, पण तरीही संघव्यवस्थापनाने आपल्या या होनहार खेळाडूवर विश्वास ठेवला आणि आज ऐनवेळी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला अंतीम अकरात स्थान मिळाले.

त्याचा जबरदस्त फायदा उठवून त्याने एक शानदार खेळी करून संघ (IND VS PAK) व्यवस्थापन त्याची का पाठराखण करते हे सिद्ध केले.त्याने 100 चेंडूत 100 धावा करत आपले 6वे एकदिवशीय शतक पूर्ण करून संघात शानदार पुनरागमन केले.

त्याला आधी साथ देत आहे असे कोहलीची फलंदाजी बघून वाटत होते पण महान कोहलीने कधी टॉप गियर टाकला आणि कधी आपले 47 वे शतक पूर्ण केले हे ना प्रेक्षकांना कळाले ना पाकिस्तान खेळाडूंनाही.

याचसामन्यात कोहलीने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक जलदगतीने 13000 धावा पूर्ण करुन महान क्रिकेट लिजेंड सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या विक्रमाला आपल्या नावावर केले.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

सचिनने 321 सामन्यात13000 धावा केल्या होत्या, तर विराटने फक्त 267 सामने खेळून हा विक्रम आपल्या नावावर केला. कोलंबोच्या प्रेमदासावर विराटचे हे सलग चौथे शतक.

आता विराट सचिनपेक्षा फक्त दोन शतके मागे आहे(एकदिवशीय IND VS PAK सामन्यात). असाच धडाका त्याने चालू ठेवल्याने या जोडीने नाबाद द्विशतकी भागीदारी करत भारतीय संघाला एका विशाल धावसंख्येवर आरामात नेवून पोहचवले.

भारतीय संघाने 2 बाद 356 अशी मोठी धावसंख्या रचत आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघावर एक मनोवैज्ञानिक दडपण आणून ठेवले.अखेरच्या षटकातल्या शेवटच्या दोन चेंडूवर विराटने चौकार आणि षटकार मारत ही खेळी अविस्मरणीय केली.

भारतीय संघाची आशिया कप स्पर्धेतली सर्वोच्च पाकिस्तान विरुद्धची धावसंख्या.या जोडीने 1996 साली सिद्धू सचिन जोडीची भागीदारी मोडून काढत 233 धावांची नवी विक्रमी भागीदारी आपल्या नावावर केली.थोडक्यात काय तर रोहित आणि गील जोडीने सलामीच्या रचलेल्या शतकी भागीदाराच्या पायावर कोहली, राहुल जोडीने द्विशतकी भागीदारी करुन कळस रचला.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुखापतीनंतरच्या मोठया कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह या भारतीय संघाच्या हुकमी एक्क्याने इमान उल हकला चकवत आपल्या तिसऱ्याच षटकात भारतीय संघाला मोठे यश मिळवून देताना पाकिस्तान संघालाही मोठा धक्का दिला.

त्याच्या जागी खेळायला आला तो कर्णधार बाबर आझम. त्याला (IND VS PAK) पाकिस्तानचा आजच्या घडीतला सर्वात मोठा आणि प्रतिभावंत फलंदाज मानले जाते. पण आज त्याची डाळ पंड्याने शिजू दिली नाही. त्याने आपल्या पहिल्याच षटकात आजमला त्रिफळाबाद करुन भारतीय संघाला मोठेच यश मिळवून दिले.

या विकेट मुळे भारतीय संघात आणि त्यांच्या चाहत्यात आनंदाची एक लहर उठली पण त्यात लगेचच पावसाने व्यत्यय आणत जणू मिठात दुधाचा खडा टाकला.यावेळी पाकिस्तान संघाची अवस्था 11 व्या षटकाच्या दरम्यान 2 बाद 44 अशी बिकट झाली होती.

पावसाने जवळपास एक तास व्यत्यय आणल्यानंतर पाकिस्तानचा डाव पुन्हा सुरु झाला आणि त्यानंतरच्या पहिल्याच षटकात शार्दुल ठाकूरने खतरनाक फलंदाज मोहम्मद रिझवानला केवळ 2 धावांवर बाद करुन पाकिस्तानची अवस्था चांगलीच बिकट करून टाकली.

त्यानंतर कुलदीप यादवने एक अप्रतिम स्पेल टाकत पाकिस्तानची मधली फळी पूर्णपणे कापून टाकली. त्याने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच गडी बाद करत आजचा दिवस अविस्मरणीय केला.

पाकिस्तान संघाकडून आज फारसा प्रतिकार झाला नाही ना ती चुरस दिसली जी भारतीय संघाविरुद्ध लढताना नेहमी दिसते.हरिस रौफ आणि नसीम शाह जायबंदी झाल्याने फलंदाजी करु शकले नाहीत. त्यामुळे पाक संघाचा डाव 8 बाद 128 वरच समाप्त झाला.

कुलदीपच्या या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघाचा मोठा पराभव झाला. 228 धावांच्या भल्या मोठ्या फरकाने पाकिस्तानला पराभूत करून भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड चालू ठेवून चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली आहे.

47 वे शतक करून विश्वविक्रमाच्या दोन पावले जवळ आलेल्या आणि या अविस्मरणीय शतकामुळे भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या विराट कोहलीला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
भारत 2 बाद 356
रोहित 56,गील 58,राहुल नाबाद 111,कोहली नाबाद 111
आफ्रिदी 79/1,शादाब 71/1
विजयी विरुद्ध
पाकिस्तान
32 षटकात 8 बाद 128
बाबर 10,जमान 27,सलमान आगा 23,इफ्तीखार 23
कुलदीप 25/5,ठाकूर 16/1,बुमराह 18/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.