IND vs SA 2nd ODI 2022 Updates : भारताचा लाजिरवाणा पराभव

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – यजमान दक्षिण आफ्रिका संघाने पार्ल येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघावर सात गडी राखुन मोठा विजय मिळवितानाच मालिका सुद्धा खिशात टाकली आहे. पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना मजबूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाला चारीमुंड्या चित करत धूळ चारतानाच स्वप्नातून जागे केलेले आहे. या विजयामुळे यजमान संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ एक दिवसीय मालिका जिंकण्याचा भीमपराक्रमही केला आहे.

करो या मरो अशा स्थितीत असल्याने, प्रतिष्ठा पणाला लागलेल्या भारतीय संघाला आज कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे गरजेचेच होते. पहिल्या पराभवाला विसरून भारतीय संघ या सामन्यात काहीही बदल न करताच खेळायला आला,राहुलने नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका संघाने जंसेन ऐवजी सिसंडा मगालाला संघात घेऊन केलेला एकमेव बदल होता.

पहिल्या सामन्यात 46 धावांची सलामी दिलेल्या या जोडीने आज 63 धावांची सलामी दिली. दोघेही छान खेळत होते,मात्र नेमके याचवेळी धवनला घाई नडली आणि तो मार्करमच्या गोलंदाजीवर बाद29 धावा काढून झाला आणि या धावसंख्येत केवळ एकाच धावेची भर पडलेली असताना विराट कोहलीला केशव महाराजने आल्यापावली परत पाठवून भारताला दुसरा आणि मोठा धक्का दिला.

कोहली तर भोपळा सुद्धा फोडू शकला नाही.योगायोग म्हणजे आज बाद झालेले दोन्हीही फलंदाज पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडुन बऱ्यापैकी खेळले होते, त्यामुळेच त्यांचे आज अशी आन बाण आणि शान प्रतिष्ठेला लागलेल्या सामन्यात लवकर आणि स्वस्तात बाद होणे भारतीय संघासाठी खूपच धक्कादायक होते, पण यानंतर सूरु झाला द ऋषभ पंत शो.

त्याच्यावर कोणी कितीही टीका करो,पण तो असा फलंदाज आहे जो त्याच्या एकटयाच्या जीवावर कधीही सामना फिरवू शकतो,आणि हे संघ व्यवस्थापणाला चांगलेच माहिती असल्याने ते नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून आलेले आहे,आज त्याने तो विश्वास अनाठायी नाही हे सोदाहरण पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवणारी घणाघाती आणि उपयुक्तही फलंदाजी केली.त्याने कर्णधार राहूलला साथ देताना भारताचा डाव चांगलाच सावरला.

बघताबघता या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. याच दरम्यान दोघांनीही आपापले अर्धशतक पूर्ण केले.राहूलचे दहावे तर पंतचे हे चौथे अर्धशतक ठरले.यानंतर यांची शतकी भागीदारी सुद्धा पूर्ण झाली. ही जोडी जमली आहे असे वाटायला लागलेले असताना कर्णधार राहुल वैयक्तिक 56 धावा काढून मगालाच्या गोलंदाजीवर बाद झाला मात्र त्याने पंतसोबत तिसऱ्या गड्यासाठी 115 धावांची बहुमूल्य भागीदारी करून डाव सावरण्यात मोठे योगदान दिले.

पंत मात्र पूर्ण भरात आला आहे असे वाटत होते,तो आपल्या पहिल्या शतकाकडे वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच तरबेज शमसीने त्याच्या चांगल्या खेळीचा अंत केला.त्याने केवळ 71 चेंडूत दोन उत्तुंग षटकार आणि दहा चौकार मारत 85 धावा केल्या,ज्या त्याच्या आतापर्यंतचे सर्वोच्च एकदिवसीय सामान्यातल्या वैयक्तिक धावा आहेत.

खरे तर शतकाजवळ आल्यानंतर त्याने थोडा संयम दाखवला असता तर आज कदाचित नुसते शतकच नाही तर मोठे शतक सुद्धा होवू शकले असते, पण या बाबाला ते जमत नाही, त्याचा खेळ आहे तो असाच आणि तसेही क्रिकेट मध्ये जर तरला काहीच अर्थ नसतो. तो खेळत होता तोवर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे असे वाटत होते,पण तोच पंत बाद झाल्याने आफ्रिकन संघांच्या जीवात जीव आला.

त्यानंतर त्यांनी टिच्चून गोलंदाजी केली, त्यात दोन्हीही अय्यर त्यांच्या जाळ्यात सापडले,एकवेळ तीनशेच्या पूढे जाईल अशी वाटणारी धावगती एकदम रोडावली, पण तरिही ठाकूरने अश्विन सोबत उपयुक्त फलंदाजी केल्याने भारतीय संघ आपल्या निर्धारित 50 षटकात 287 धावा करू शकला.ठाकूर 40 तर अश्विन 25 धावा काढून नाबाद परतले. आफ्रिकेकडून शमशीने 2 तर ,मगाला,महाराज,मार्करम आणि फेलुकवालीयोने एकेक गडी बाद केला.

उत्तम भरात असलेल्या फलंदाजाच्या चांगल्या कामगिरीला ब्रेक कसा ब्रेक लागतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्रेयस अय्यर,मायदेशी झालेल्या मालिकेत उत्तम कामगिरी करूनही त्याला आफ्रिकेत कसोटीत संधी मिळाली नाही अन नकळत त्याचा मानसिक परीणाम त्याच्या कामगिरीवर झालाच,पहिल्या आणि आजच्या सामन्यात तो दडपणाखाली आहे हेच जाणवले ,नाही तर आज भारतीय संघ नक्कीच 300च्या पुढे गेला असता.

आता या चांगल्या धावसंख्येचा बचाव करणे ही जिम्मेदारी भारतीय गोलंदाजांची होती.बुमराहने चांगली सुरूवात केली खरे,पण भुवीच्या पहिल्याच षटकात डीकॉकने सोळा धावा चोपून दणक्यात प्रत्युत्तर दिले.हा धडाका नंतरही कायम ठेवत त्याने आठव्या षटकाच्या आतच संघाचे अर्धशतक पूर्ण करुन जोरदार सुरुवात करून दिली. भुवीच्या गोलंदाजीला थांबवून राहुलने अश्विनला आणले पण डीकॉकचा झंझावात थांबेना.

बघताबघता त्याने केवळ 39 चेंडूतच आपले 27 वे अर्धंशतक पूर्ण केले.दुसऱ्या बाजूने त्याला मलान पण चांगली साथ देत होता.त्यामुळेच 17 व्या षटकाच्या आत त्यांनी 100 धावा पण पूर्ण करून भारतीय गोलंदाजांना एकप्रकारे सज्जड असा इशाराही दिला. नवखा राहूल या आक्रमनाने पुरता हैराण झालेला दिसला.

अखेर शार्दुल ठाकुरने ही जोडी तोडली. त्याने खतरनाक डीकॉकला 78 धावावर पायचीत केले,तेव्हा आफ्रिका संघाच्या एक बाद 132 धावा झाल्या होत्या.त्याने रचलेल्या पायावर कर्णधार बाऊमा आणि मलानने कळस चढवला,मलान तुफानी हल्ला करत होता, त्याच नादात तो वैयक्तिक 91 धावा असताना बुमराहच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.पण त्याने संघाचा विजय जवळ आणला होता.थोड्याच वेळात बाऊमा पण वैयक्तिक 35 धावांवर असताना चहलच्या गोलंदाजी त्याच्याच हातात झेल देवून बाद झाला. यावेळी आफ्रिका संघाला विजयासाठी जवळपास 80 दुवा हव्या होत्या, पण भारतीय गोलंदाज ना तो दबाव टाकू शकले ना बळी घेऊ शकले.

त्यामुळेच फॉर्मात असलेल्या वँनडेरसेन आणि मार्करम यांनी आरामात खेळत मोठा विजय मिळवून देत कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला.या दणदणीत पराभवाने भारतीय संघ आभासी दुनियेतून खडबडून जागा व्हावा आणि त्याने हा पराभव म्हणजे एक दुःखद स्वप्न समजून त्याला विसरून भविष्यात दैदिप्यमान कामगिरी करून दाखवावी इतकीच अपेक्षा खरे क्रिकेटरसिक करत असतील. कारण हा पराभव झाला म्हणण्यापेक्षा भारतीय खेळाडूंनी केलेल्या हाराकरीने झाला असल्याची भावना जास्त आहे.

तुफानी फलंदाजी करून विजयाचा पाया रचणारा डीकॉक सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक – 

  • भारत 287/6 –  पंत 79,धवन 29 ,ठाकुर नाबाद 40,अश्विन नाबाद 25
  • द. अफ्रिका – 3 बाद 288,  डीकॉक 78,मलान 91, मार्करम नाबाद 37, वँनडरसेन नाबाद 37

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.