IND Vs SA 3rd Test Day 2 : भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची खराब सुरुवात; कसोटी मात्र रंगतदार 

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीला मागे टाकून बुमराह आणि कंपनीने जबरदस्त गोलंदाजी करून आफ्रिका संघाचा पहिला डाव 210 धावात गुंडाळून भारताला पहिल्या डावात नाममात्र का होईना पण 13 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली खरी, पण यातून जराही प्रेरणा न घेता भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या डावातही खराब कामगिरी करून त्यांच्या चांगल्या कामगीरीवर विरजन पाडले. आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 57 धावा केल्या आहेत. ज्यामुळे भारतीय संघाकडे आता 70 धावांची आघाडी आहे.

भारतीय संघाने आज सुरुवात तर खूपच चांगली केली. आजच्या दिवसातल्या पहिल्याच षटकात कर्णधार डीन एलगरला बुमराहने बाद करून स्वप्नंवत सुरुवात करून दिली खरी, पण आधी केशव महाराजने, तर नंतर पीटरसनने चिवट फलंदाजी करुन भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. केशव महाराज नेहमीच चांगली फलंदाजी करतो आणि त्याच्यात एक मोठा अष्टपैलू बनण्याची पूर्ण क्षमता आहे असे आफ्रिकन संघाचे म्हणणे असते यावर जणू शिक्कामोर्तब करण्याचा मनसुबा घेऊन आज तो खेळला.

कर्णधार एलगर बाद झाल्यानंतर बुमराह आणि शमी अतिशय तिखट गोलंदाजी करत आग ओकत होते,पण त्यांना केशव महाराज चांगलेच खेळुन तोडीस तोड उत्तर देत होता. त्याने धावा किती काढल्या यापेक्षा त्याने जास्तीत जास्त वेळ खेळून भारतीय संघाच्या तोफखान्याला सामोरे जात आजच्या दिवसाच्या सुरुवातीला आफ्रिका संघाला एकप्रकारे चांगलाच आत्मविश्वास दिला.

दरम्यान, उमेश यादवने त्याला 27 धावावर त्रिफळा बाद करून आजच्या दिवसातले दुसरे आणि एकूण तिसरे यश मिळवून दिले,पण त्याच्या चांगल्या खेळण्याने दक्षिण आफ्रिका संघात एकप्रकारे जोश ही आला आणि आत्मविश्वासही मिळाला, त्यानंतर पीटरसन आणि वँनडरसेन चौथ्या गड्यासाठी चांगली भागीदारी करत डाव पुढे चालूच ठेवला आणि उपहारापर्यंत भारतीय संघाला आणखी यश मिळू दिले नाही.

अखेर 67 धावांची भागिदारी जोडून वैयक्तिक 21 धावा करून वँनडरसेन उमेशची दुसरी शिकार ठरला. यावेळी आफ्रिका संघाची अवस्था चार बाद 112 होती, त्यामुळे भारतीय संघासाठी ही एक चांगली गोष्ट होती,पण इथेच भारतीय गोलंदाज ढिले पडले. ज्याचा फायदा बाऊमा आणि पीटर्सनने उठवला. याचदरम्यान पीटर्सनने आपले दुसरे अर्धशतक ही पूर्ण केले.

पीटर्सनकडून आफ्रिका संघ आणि सर्वच देश खूप अपेक्षा बाळगून आहे. तो एक उगवता तारा आहे, असे तिथल्या क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. त्याला न्याय देणारी खेळी करण्यात त्याला आज बऱ्यापैकी यश आले असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही.  बाऊमा तर या मालिकेत सातत्याने भारतीय गोलंदाजांना चांगलेच तोंड देत आला आहे,त्यामुळे ही जोडी जमली.

खेळपट्टीचाही मूड बदलला आणि या दोन्ही फलंदाजांना आरामात खेळता यायला लागले, बुमराह, शमी हे ही जरासे थकल्याने आणि ठाकूर,यादव यांनी काहीसा स्वैर मारा केल्याने या जोडीला धावा जमवणे फारसे अवघड गेले नाही, बघताबघता या जोडीने संघाची धावसंख्या दीडशेच्या पुढे नेली.यांचीअर्धशतकी भागिदारी बऱ्यापैकी फुलत आली असतांनाच शमीने बाऊमाला कोहलीच्या हातून झेलबाद करून ही जोडी फोडली आणि याच षटकात यष्टीरक्षक कायले विरीयनला भोपळाही न फोडू देताच पंतच्या हातून बाद करून संकटात आणले.

या लागोपाठ मिळालेल्या दोन विकेट्स मुळे भारतीय संघात नवचैतन्य आल. त्यातच बुमराहने जंसेनला बाद करून आफ्रिका संघाला सातवा धक्का देत चहापानाला त्यांची अवस्था 7 गडी बाद 176 अशी केली. पीटर्सनने मात्र एक बाजू लावुन धरली होती. अजूनही भारतीय संघाकडे 47 धावांची आघाडी होती. अखेर बुमराहनेच त्याला पुजाराच्या हातून झेलबाद करून त्याची 72 धावांची झुंजार खेळी संपुष्टात आणली.त्याने 166 चेंडु खेळून नऊ चौकार मारत ही मोठी आणि महत्वपूर्ण खेळी केली.

त्याच्या या खेळाने प्रेरणा घेत यजमान संघाच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करत चांगलाच प्रतिकार करून भारतीय संघाला मोठी आघाडी मिळू दिली नाही.  जे काम भारतीय संघाच्या अनुभवी फलंदाजांना करता आले नाही ते काम यजमान संघाच्या खेळाडूंनी करून भारतीय संघाला एक संदेशही दिला आणि जोरदार तमाचाही. अखेर बुमराहने इंगीडीला बाद करून आफ्रिका संघाचा डाव संपवला. बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीत सातव्यादा एका डावात पाच वा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगीरी केली.यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात नाममात्र का होईना पण 13 धावांची आघाडी मिळाली.

बुमराहने 42 धावा देत पाच,तर शमी व उमेशने दोन दोन तर शार्दूल ठाकुरने एक गडी बाद केला यामुळे आफ्रिकन संघाचा पहिला डाव 210 धावात संपुष्टात आला.फलंदाजांनी केलेल्या हाराकरीनंतर भारतीय गोलंदाज तरी किमान आपल्या दर्जाला जागले आणि त्यांच्या याच कामगिरीमुळे भारतीय संघ या सामन्यात परत आला आहे असे वाटायला लागले होतेही मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात करताना भारतीय सलामीने या डावातही निराशाजनकच सुरुवात केली. केवळ वीस धावा झाल्या असताना मयंक आगरवाल वैयक्तिक सात धावांवर रबाडाच्या गोलंदाजीवर स्लिप मध्ये झेल देऊन बाद झाला.

रबाडाने एका अप्रतिम आऊटस्विंगवर त्याला चकवले आणि मयंकला काही कळण्याआधीच चेंडू बॅटची कड घेवून पहिल्या स्लिप मध्ये गेला.आणि एलगरने तो झेल सोडण्याची अजिबात चूक केली नाही. या झटक्यातून सावरण्याआधीच राहुल सुद्धा आपल्या जोडीदाराला एकटे वाटू नये म्हणून त्याच्या पाठोपाठ यंसेनच्या गोलंदाजीवर केवळ दहा धावा काढून बाद झाला.

महत्वाच्या क्षणी दोन्हीही सलामीवीरांनी केलेली ही खराब फलंदाजी खरोखरच चिंताजनक विषय आहे,त्यानंतर कर्णधार कोहली आणि पुजारा यांनी सावधगिरी बाळगत अधिक पडझड होवू दिली नाही आणि आजचा खेळ संपला तेंव्हा दोन गड्याच्या मोबदल्यात 57 धावा केल्या आहेत. कर्णधार कोहली 14 तर पुजारा 9 धावा काढून नाबाद आहेत.

या निर्णायक कसोटीचा आजचा केवळ दुसराच दिवस असूनही आज खेळपट्टीने वेगवेगळे रूप दाखवले. आज दिवसभरात तब्बल अकरा विकेट्स पडल्याने ही कसोटी चौथ्या दिवसाच्या आत काय काय रंग दाखवणार हा प्रश्न तर आहेच, शिवाय मागील कसोटीत यजमान संघानी 240 धावांचा केलेला यशस्वी विक्रमी पाठलाग यामुळे भारतीय संघ किती मोठी धावसंख्या दुसऱ्या डावात करून विजयाकडे मार्गक्रमण करेल या यक्षप्रश्न आज तरी माझी झोप उडवून गेला आहे, तुम्हाला काय वाटतं उद्या काय काय होऊ शकतं याबद्दल?

संक्षिप्त धावफलक – 

  • भारत – पहिला डाव सर्वबाद 223, आणि दुसरा डाव 2 बाद 57
  • द.आफ्रिका –  पहिला डाव सर्वबाद 210, पिटर्सन 72, बुमराह 42/5 गडी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.