IND Vs SA 3rd Test Day 3 : पंतची एकाकी झुंज भारतीय संघाला विजय मिळवून देणार का?

एमपीसी न्यूज – बलाढ्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाला निर्णायक कसोटीच्या दुसऱ्या डावात केवळ 198 मध्ये सर्वबाद केल्यानंतर विजयी लक्षाचा पाठलाग करताना यजमान आफ्रिका संघाने आपल्या दुसऱ्या डावात दमदार सुरुवात केली, मात्र आजच्या दिवसातल्या शेवटच्या षटकात कर्णधार डील एलगरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवून भारतीय संघ या कसोटीला पुन्हा एकदा रंगतदार करण्यात यशस्वी ठरला आहे. आजचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघांने दोन गडी गमावून 101 धावा केल्या आहेत. अजूनही यजमान संघाला 111 धावा हव्या आहेत तर भारतीय संघाला विजयासाठी 8 गडी बाद करावे लागतील.

भारतीय संघाचे आपल्या पहिल्यावहिल्या दक्षिण आफ्रिकेतल्या मालिका विजयाचे स्वप्न सत्यात उतरणार की त्याचा चुराडा होणार याचा फैसला आता जास्तीतजास्त उद्याच होईल, मात्र स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करायचे असतात नुसते स्वप्न बघून काही उपयोग होत नसतो, हेच भारतीय संघातले खेळाडू विसरले असावे असे आजचा खेळ बघून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रिकेट रसिकांचे झालेच तर त्यात दोष नक्कीच खेळाडूंचा असेल. अपवाद एकट्या ऋषभ पंतचा!

तो एकाकी शिलेदार असल्यासारखे खेळला, त्याने जबाबदारी आपल्या कोवळ्या खांद्यावर घेतली आणि ती निभावण्यासाठी त्याने आपले 100% दिले,केवळ त्याच्या भगीरथ प्रयत्नामुळेच भारतीय संघ यजमानांना जिंकण्यासाठी 211 चे लक्ष्य देवू शकला आहे.पंतच्या चौथ्या कसोटी शतकामुळे भारतीय संघाचा दुसरा डाव 198 धावांवर संपुष्टात आला, ज्यामध्ये एकट्या पंतच्या नाबाद 100 धावा आहेत.

कालच्या नाबाद जोडीने आज खेळ सुरू केला आणि भारताला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला.पुजारा कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर न घालता मार्को जंसेंनच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला,या धक्क्यातून सावरण्याची जराही संधी /उसंत न देता अजिंक्य रहाणे धावसंख्येत फक्त एका धावेची भर घालून आल्या पावली परत गेला.यावेळी भारतीय संघाची अवस्था चार बाद 58 अशी झाली होती.

यानंतर खेळायला आला तो पंत. आक्रमकता ज्याचा स्थायीभाव आहे. ज्या आक्रमकतेमुळे त्याला वारंवार टीकेचा धनी व्हावे लागते त्या पंतने आज त्याच आक्रमकतेच्या जोरावरच संघाला सावरले. कर्णधार कोहली बरोबर त्याने पाचव्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली, ज्यात कोहलीच्या फक्त 14 धावा होत्या, पण त्याने पंतला जास्तीत जास्त खेळायची संधी दिली.  हो,ही जोडी डाव सावरत आहे असे वाटायला लागताच पुन्हा एकदा घात झाला आणि कोहली वैयक्तिक 29 धावावर असताना एंगीडीच्या गोलंदाजीवर मार्करमच्या हाती झेल देऊन बाद झाला.

143 चेंडू खेळणाऱ्या कोहलीने आज कमालीची चिकाटी दाखवली,संयम दाखवला पण लुंगी इंगीडीने त्याच्या चिवट खेळीचा अंत केला. यावेळी भारतीय संघाची अवस्था 5 बाद 152 अशी झाली होती, मात्र दुसऱ्या बाजूला पंत खूप निर्धाराने आणि आक्रमक अंदाजात खेळत होता. त्याला कोणीही साथ द्यायला थांबत नव्हते, तो आपले आक्रमण चालू ठेवत असताना दुसऱ्या बाजूने मात्र एकापाठोपाठ एक बळी जात होते, तरीही त्याने आपली खेळी त्याच जोशात चालू ठेवली.

सहा चौकार आणि चार षटकार मारत केवळ 139 चेंडूत नाबाद 100 धावा ठोकत आपले चौथे शतक पूर्ण केले.पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणत्याही स्वरूपाची मोठी साथ न मिळाल्याने भारतीय संघाचा दुसरा डाव 198 धावात संपुष्टात आला.पंत नंतर कोहलीच्या 29 तर राहूलच्या दहा धावा याच दोन आकडी आहेत, त्यामुळेच कदाचित दक्षिण आफ्रिकन संघाने मनाचा मोठेपणा दाखवत तब्बल 29 अतिरिक्त धावा दान केल्या, ज्यामुळेच भारतीय संघ 211 धावांचे लक्ष्य यजमानांपुढे ठेवू शकला.आफ्रिका संघाकडून जंसेंनने सर्वाधिक चार तर रबाडा आणि लुंगी एंगीडीने तीन तीन गडी बाद केले.

211 या विजयासाठी आवश्यक असलेल्या आणि भारतीय संघाच्या स्वप्नाला उध्वस्त करणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान संघाला मोहम्मद शमीने पहिला धक्का लवकरच दिला.त्याने मार्करमला त्याच्या 16 संघाची धावसंख्या 23 असताना बाद केले.पण डीन एलगर आणि पीटर्सनने या धक्क्याने न डगमगता आपल्या ध्येयाला गाठण्यासाठीचे प्रयत्न चालू ठेवले.डीन एलगरने मागच्याच सामन्यात एक अविस्मरणीय खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता, आणि पीटर्सन तर आपल्याला नेहमीच या मालिकेत डोईजड होत आला आहे.

त्यामुळे ही जोडी लवकरात लवकर तोडणे भारतीय संघासाठी महत्वाचे होते,पण या जोडीने जबरदस्त फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच सामना करत अंत ही बघितला,बघता बघता या जोडीने अर्धशतकी भागिदारी करून सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला.

जवळपास खेळ समाप्त होण्याची वेळ आली असताना बुमराहने कर्णधार डीन एलगरला वैयक्तिक 30 धावावर पंतच्या हाती झेल द्यायला लावून बाद करत संघाला दुसरे यश मिळवून तर दिलेच, पण या महत्वपूर्ण विकेटमुळे वापस सामना आणि मालिका जिंकून देण्याची सुवर्णसंधीही.पीटर्सनने मात्र पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजाना निष्प्रभ ठरवले ,तो 48 धावा काढून नाबाद आहे.

उद्या चौथ्या दिवशी बाऊमा आणि पीटर्सनला लवकर बाद करण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले तर कोण जाणे भारतीय संघ सामना आणि मालिका ही जिंकू शकतो,बरोबर ना? उम्मीदपे ही दुनिया कायम आहे,उद्या चमत्कार होणार हे नक्की. जो जिंकेल तो इतिहास रचनार!

संक्षिप्त धावफलक –

  • भारत –  223 आणि 198
  • दक्षिण आफ्रिका – 210 आणि दुसरा डाव 2 बाद 101

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.