Ind Vs Shrilanka : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना, संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष

एमपीसी न्यूज – जुलैपासून भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात तीन ODI तीन T20 सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व सलामीवीर शिखर धवन याच्याकडे देण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी आज (सोमवारी) भारतीय संघ रवाना झाला आहे.

सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन ODI तीन T20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी अनुभवी राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. तसेच, या दौऱ्यासाठी अनेक नव्या दमाच्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघाच्या एकूण कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही मोसमांमधून आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज नितीश राणा याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर, गेल्या दोन मोसमात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड या युवा फलंदाजांनादेखील संघात स्थान मिळालं आहे.

नव्या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया याला देखील स्थान देण्यात आलं आहे. साकरियाने यंदा राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि अवघ्या 7 सामन्यांनंतर त्याला थेट भारतीय संघाकडून बोलावणं आलं आहे. याशिवाय अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमदेखील संघात दाखल झाला आहे, तर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि नवदीप सैनी यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला न्यूझीलंड कडून पराभव पत्करावा लागला. आणि पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब न्यूझीलंडने आपल्या नावे केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकणार अशी क्रिकेटप्रेमींना आशा होती मात्र, संघाच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

* असा आहे संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.