IND Vs SL T20 : भारताची 20/20 सामन्यात विजयी सलामी

एमपीसी न्यूज :(विवेक कुलकर्णी) भारतीय संघाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर दमदार विजय, सलामीच्या 20/20 सामन्यात श्रीलंका संघाला 38 धावांनी हरवले शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नवोदित संघांनी एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर 20/20मध्येही विजयी सुरुवात करताना यजमानांना सांघिक कामगिरीवर मात देत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

कोलंबो येथील प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या 20/20 सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकली खरी पण त्यांना पराभव पत्करावा लागला, दमदार सुरूवातीनंतर मधल्या फळीच्या कचखाऊ फलंदाजीमुळे छोटे वाटणारे आव्हान सुद्धा लंकेला पार करता आले नाही.

आज भारतातर्फे 20/20 मध्ये पृथ्वी शॉ आणि वरून चक्रवर्ती यांनी पदार्पण केले. मात्र कसोटीत दमदार शतकी खेळी करून आपले नाव गाजवणारा पृथ्वी शॉ आज मात्र पहिल्याच चेंडूवर बाद झाला.हा दुर्दैवी योग म्हणावा लागेल.

यानंतर संजू सॅमसनने कर्णधार धवनच्या साथीने 51 धावाची भागीदारी नोंदवली, संजू हा अत्यंत चांगला आणि एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू म्हणून आयपीएल मध्ये ओळखला जातो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात अद्यापही ही ओळख खरी वाटावी अशी कामगिरी करता आलेली नाही, आजही तो 20 चेंडूत 27 धावा करून टिकलाय असे वाटत असतानाच बाद झाला.

भारतासारख्या मोठ्या देशात गुणवत्ता असलेले असंख्य खेळाडू आहेत, त्यामुळे जर तुम्हाला या दर्जावर खेळायचे असेल तर सातत्य दाखवावेच लागते नाहीतर किती आले किती गेले अशी अवस्था होते, यानंतर अनेक समीक्षक आणि जेष्ठ माजी खेळाडूंना भारताचे सर्व फॉरमॅट मधील उज्जवल भविष्य आहे असे वाटणारा सुर्यकुमार यादव आला आणि अक्षरशः सुर्यासारखा तळपू लागला.

केवळ  34 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार मारून अर्धशतक करून तो बाद झाला, पण तत्पुर्वी त्याने कर्णधार धवन बरोबर अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला होता, याच दरम्यान धवन सुद्धा 46 धावांची बहुमूल्य खेळी करून बाद झाला, ईशान किशनने आपली विकेट राखत मधल्या फळीतील खेळाडूंना सोबत घेऊन संघाला 164 धावांची मजल मारून दिली, मात्र दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पंड्याला आजही विशेष चमक दाखवता आली नाही.

165 धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानावर उतरलेली लंकन फलंदाजी मात्र जराही बहरली नाही की लढूही शकली नाही. अपवाद फक्त चरिथ असलंकाचा. त्याने 26 चेंडूत 44 धावा करताना जरा तरी लढत दिली.

बाकीचे फलंदाज अनुभवी भुवनेश्वरच्या जबरदस्त गोलंदाजी पुढे अक्षरशः धारातीर्थी पडले, त्याला दीपक चहर आणि यजुवेंद्र चहलने उत्तम साथ दिली, तर पदार्पण करणाऱ्या वरुन चक्रवर्तीने सुध्दा चांगली गोलंदाजी करत आपले पदार्पण बऱ्यापैकी गाजवले असे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही.

आज गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक भारतीय गोलंदाजानी विकेट मिळवत एरव्ही मामुली वाटणारे आव्हान या लंकन संघाला खूपच कठीण करून टाकत दमदार विजय मिळवला. आपल्या चार षटकात चार बळी घेणाऱ्या भुवनेश्वरलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

आगामी 20/20विश्वचषकासाठी आपले नाणे जोरदारपणे वाजवत त्याने कोहलीला एकप्रकारे खास आनंद दिला असे म्हटले तर काही गैर ठरणार नाही, कारण अंतीम षटकात बुमराहला एक प्रकारे त्याची अशीच साथ कोहलीला अपेक्षित आहे. त्यामुळेच आजची भूवीची कामगिरी संघाला आणि भारतीय क्रिकेट रसिकांना खूप आनंद देणारी आहे, असे छातीच ठोकपणे म्हणता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.