Ind vs Aus T20 Series : पंड्याची चमकदार कामगिरी, भारताने सामन्यासह मालिका घातली खिशात

एमपीसी न्यूज – भारतीय खेळाडूंनी फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा T20 सामना 6 गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत सामन्याचं चित्र बदलून टाकलं. या विजयासह भारताने तीन T20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने बाजी मारत मालिका खिशात घातली आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ मधल्या काही षटकांमध्ये अडचणीत सापडला होता. विराट कोहली माघारी परतल्यानंतरही हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर जोडीने फटकेबाजी करत कांगारुंच्या हातात आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला. हार्दिकने 22 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 44 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 56 भागीदारी केली. अँड्रू टायने राहुलला माघारी धाडल्यानंतर शिखर आणि विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार दिला. झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्याने 36 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला.
विराट कोहलीने पांड्याच्या साथीने सुरेख फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम ठेवलं. विराट डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने 40 धावांची खेळी केली. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली आणि भारताचं आव्हान कायम ठेवलं. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी 25 धावांची गरज होती. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान सहज पूर्ण करत सामना खिशात घातला.

Hardik Pandya smashes two big sixes off Daniel Sams to help India win the second T20I by 6️⃣ wickets 🎉
They have also won the series!#AUSvIND pic.twitter.com/rcRY5C5bHD
— ICC (@ICC) December 6, 2020
कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या T20 सामन्यात 194 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार वेडने 58 तर स्मिथने 46 धावांचं योगदान दिलं.
ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजीला सुरुवात करत भारतावर दबाव आणाला. शार्दुलने मॅक्सवेलला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली, त्याने 22 धावा केल्या. फटकेबाजी करणारा स्टिव्ह स्मिथही चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने 38 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा केल्या. भारताकडून नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.