Indapur Crime News : सासूच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सुनेचा खून

एमपीसीन्यूज : सासूच्या प्रियकरासोबतच अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पती, सासू यांच्यासह सासरकडच्या चार लोकांनी बेदम मारहाण करून सुनेचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील लोखंडी अँगलला लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव केला होता.

परंतु पोलिसांनी हा बनाव उघड केला असून याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात 20 मार्च रोजी हा प्रकार घडला. इंदापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभा ज्ञानदेव भोंग, बाळू ज्ञानदेव भोंग, सुनील बाळू भोंग आणि किरण बाळू भोंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी राणी किरण भोंग या महिलेचा खून केला आहे. याप्रकरणी सावित्री उर्फ आक्काबाई हरी नाळे (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी राणी भोंग ही सासरी नांदत असताना राणी हिचे आरोपी शोभा हिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयातून त्यांनी राणी हिला बेदम मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून खून केला.

त्यानंतर तिचा मृतदेह घरातील लोखंडी अँगलला ओढनीने लटकवला आणि खिडकीतून बाहेर येऊन तिने गळफास घेतल्याचा बनाव केला.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.