Indapur: विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना 27 मेच्या आत आमदार होणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यात 9 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक 21 मेला होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव महत्वपूर्ण आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी कुजबूज पुणे जिल्ह्यात सुरू आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे पाच तर, भाजपचे चार सदस्य विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. भाजपतर्फे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामध्ये पाटील यांना संधी मिळणार का, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

21 मे रोजी या नऊ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी चार मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल.  11 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 12 मे रोजी अर्जांची छाननी होणार असून 14 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 21 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.