Indapur News : बोरीच्या 142 शेतकऱ्यांनी एकरकमी भरले तब्बल 51 लाखांचे वीजबिल

एमपीसी न्यूज: इंदापूर ( Indapur) तालुक्यातील बोरी गावातील ( Bori Village)  142 शेतक-यांनी कृषीपंपाच्या ( Agricultural Pump) 96 लाख 78 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी एकाच दिवशी 51 लाख रुपयांचे वीजबिल भरले ( Electricity Bill paid)  आहे. त्यामुळे या 142 शेतक-यांना तब्बल 45 लाख 76 हजार रुपयांची वीज बिल माफी मिळाली तसेच महावितरणाने (MSEDCL) त्यांचा सत्कारही केला.

बोरी गावात महावितरणाचे एकूण 1041 कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे 7 कोटी 71 लाखांची थकबाकी आहे. यातून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या उपस्थितीत शेतकरी ग्राहकांचा मेळावा अयोजित करण्यात आला होता.

यांत पावडे यांनी सर्व शेतक-यांना 2020 च्या कृषी धोरणाची सविस्तर माहिती दिली. पहिल्या चालू वर्षांत सहभाग घेतल्यास दंड, व्याज, निर्लेखित करून शिल्लक राहणा-या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उरलेली रक्कम माफ होणार आहे. हे समजल्यावर शेतक-यांनी लगेच थकबाकी भरायची तयारी दाखवली आणि 142 शेतक-यांनी 51 लाख 2 हजार अशी रक्कम लगेच भरली.

या मेळाव्यासाठी महावितरणाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लुटपुटे उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ, लासुर्णेचे शाखा अभियंता अजयसिंग यादव यांनी परिश्रम घेतले.

बोरीला थकबाकीमुक्त करून गावची वीज यंत्रणा सक्षम करण्याचा संकल्प सरपंच संदीप नेवरे, छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.